कोल्हापूरचा पारा ३८ अंशांवर, उन्हाचे बसू लागले चटके
By संदीप आडनाईक | Published: March 25, 2024 07:15 PM2024-03-25T19:15:21+5:302024-03-25T19:17:17+5:30
कोल्हापूर : मार्च महिन्यातच कोल्हापूर शहराचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. भर दुपारी चटके तर बसत आहेतच, पण सायंकाळपर्यंत ...
कोल्हापूर : मार्च महिन्यातच कोल्हापूर शहराचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. भर दुपारी चटके तर बसत आहेतच, पण सायंकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होत नाहीत. यामुळे हा महिना आणि पुढचा महिन्यातही उन्हाचा तडाखा बसणार आहे, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. यंदा त्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. मार्च महिना सुरू होताच, त्याचे चटके बसू लागले आहेत. बदलत्या तापमान वाढीमुळे हवामान तज्ज्ञांनी यावेळचा उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाळा जाणवत होता. यापुढचे आठ दिवसही कमाल तापमान ३८ कायम राहणार आहे आणि किमान तापमानही २४ अंशांच्या खाली असणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा उन्हाळा अधिकच तापणार याची झलक मिळाली आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची जाणीव होऊ लागली आहे. भर दुपारी तर त्याची तीव्रता वाढतच गेली आहे. शहरातील दुपारची वाहतूक तर जवळजवळ ठप्प झाली आहे. अनेक जण घरीच राहणे पसंत करत आहेत. बाजारपेठेतील खरेदीसाठी अनेक जण सायंकाळी सहानंतर बाहेर पडत आहेत.
शहराचे पुढचे आठ दिवसाचे तापमान पुढीलप्रमाणे..
मंगळवार ३८ (२४), बुधवार ३८ (२४), गुरुवार ३८ (२३), शुक्रवार ३८ (२३), शनिवार ३८ (२४), रविवार ३८ (२२), सोमवार ३८ (२२)