‘राजाराम’ पाठोपाठ ‘भोगावती’, ‘मंडलीक’ची रणधुमाळी, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:21 PM2023-02-14T16:21:29+5:302023-02-14T16:21:58+5:30
जूनपर्यंत या कारखान्यांच्या निवडणुका घेणे प्राधिकरणापुढे अग्निदिव्य
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘कुंभी कासारी’ साखर कारखान्याचा गुलाल खाली बसतो न बसतो तोच ‘राजाराम’ साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात ‘राजाराम’सह आठ कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे प्राधान्याने ‘भोगावती’, ‘मंडलीक’, ‘आजरा’ या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. जूनपर्यंत या कारखान्यांच्या निवडणुका घेणे प्राधिकरणापुढे अग्निदिव्य आहे.
गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा नुसता धुरळा उडाला आहे. त्यात विकास, दूध, पतसंस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या आहेत. साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने त्यांच्यासाठी यंत्रणा तुलनेत अधिक लागत असल्याने इतर निवडणुकांचा अंदाज घेऊनच कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाते. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २८ डिसेंबर २०२० ला संपलेली होती.
कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत त्याच्या अगोदर म्हणजेच २० एप्रिल २०२० ला मुदत संपली आहे, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. ‘कुंभी’ची रणधुमाळी संपली असून आता ‘राजाराम’च्या अंतिम यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापाठोपाठ ‘भोगावती’, ‘बिद्री’ , ‘मंडलीक’, ‘आजरा’ या प्रमुख कारखान्यांचे बिगुल वाजणार आहेत.
‘राजाराम’साठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान
छत्रपती राजाराम साखर कारखान्याची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती, सुनावणीची प्रक्रिया होऊन साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तेथून प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होऊन एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते.
आठवड्यात उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया शक्य
सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे एप्रिल २०२१ नंतर संचालक मंडळाची मुदत संपलेल्या कारखान्यांची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालकांनी पाठवली आहे. येत्या आठ-दहा दिवसात प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेश येऊ शकतात.
निवडणुकीस पात्र कारखाने व संचालक मंडळाची संपलेली मुदत :
कारखाना - संपलेली मुदत
- राजाराम - २० एप्रिल २०२०
- सह्याद्री, धामोड - १९ एप्रिल २०२१
- इंदिरा, तांबा - १६ मे २०२१
- आजरा - २३ मे २०२१
- भोगावती - २४ एप्रिल २०२२
- गायकवाड, सोनवडे - १ मे २०२२
- मंडलीक, हमीदवाडा - जुलै २०२२
- बिद्री - ऑक्टोबर २०२२