ड्रायव्हिंग टेस्ट आता खासगी संस्थांच्या हाती; कोल्हापूर, सांगलीत अनेक मोटार ट्रेनिंग स्कूलवर येणार संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:39 PM2024-05-24T13:39:41+5:302024-05-24T13:40:38+5:30

सचिन यादव कोल्हापूर : चेकपोस्ट, वाहनांच्या स्क्रॅप, स्मार्टकार्डचा अप्रत्यक्ष खाजगीकरणानंतर ड्रायव्हिंग टेस्ट ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांना येत्या १ जूनपासून देण्याची ...

The test can be taken at the driving training institute without going to the RTO to get the driving license | ड्रायव्हिंग टेस्ट आता खासगी संस्थांच्या हाती; कोल्हापूर, सांगलीत अनेक मोटार ट्रेनिंग स्कूलवर येणार संक्रांत

ड्रायव्हिंग टेस्ट आता खासगी संस्थांच्या हाती; कोल्हापूर, सांगलीत अनेक मोटार ट्रेनिंग स्कूलवर येणार संक्रांत

सचिन यादव

कोल्हापूर : चेकपोस्ट, वाहनांच्या स्क्रॅप, स्मार्टकार्डचा अप्रत्यक्ष खाजगीकरणानंतर ड्रायव्हिंग टेस्ट ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांना येत्या १ जूनपासून देण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी मेट्रो शहरासह कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात संबंधित संस्थांकडे एक आणि दोन एकर जागा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. एकाद्या प्रशिक्षण संस्थेने ही जागा उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड शहरातील ५०० हून अधिक मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर संक्रांत कोसळणार आहे. भांडवलदारच ड्रायव्हिंग टेस्टचे मालक होणार आहे.

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते; परंतु आता आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठरावीक संस्थाना ही मान्यता दिली जाणार असल्याचा विचार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून येत्या १ जूनपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान आवश्यक असलेल्या नियमांची परिपूर्ती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात होणे शक्य नाही. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या शहराचा समावेश आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग टेस्ट मोटार वाहन स्कूलला देण्याचा विचार होता. दुचाकीसाठी २ एकर आणि चार चाकीसाठी ३ एकर जागेची अट होती. त्या वेळी राज्यातून कमी प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागात केवळ एकाच ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था उत्सुक होती. त्यानंतर नव्या नियमांत ही अट शिथिल करून दुचाकी प्रशिक्षण केंद्रासाठी १ एकर आणि चारचाकीसाठी २ एकर जागेची अट आहे. मात्र, हे नियमही मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण चालकांकडून पूर्ण होणे शक्य नाही.

रोज १७५ परवाने

कोल्हापूर आरटीओत रोज दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचे सरासरी १२५ परवाने दिली जातात. शिकाऊ परवान्याची संख्या रोज सरासरी ५० आहे. हे परवाने देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक असले तरी त्यांचा सर्व कारभार पंटरच सांभाळतात. आरटीओचे अधिकृत नसलेले कर्मचारी शिकाऊ आणि कायमस्वरूपी परवाना देण्याच्या ठिकाणी धुरा सांभाळत आहेत.

५०० हून अधिक मोटार स्कूल

नव्या नियमांनुसार काही मोटार स्कूलला मान्यता मिळाल्यास त्या-त्या शहर तालुक्यातील मोटार ट्रेनिंग स्कूलवर संक्रांत कोसळणार आहे. कारण ज्या संस्थेकडून टेस्ट होणार आहे, त्या संस्थेकडे लायसन्स काढणाऱ्यांचा कल राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड शहरातील ५०० हून अधिक मोटार स्कूलवर संक्रांत कोसळणार आहे.

अद्याप नव्या निर्णयाचे परिपत्रक आलेले नाही. आल्यास शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाईल. नियमानुसार मोटार स्कूलच्या प्रशिक्षण केंद्रात मोटार वाहन निरीक्षकांकडून तपासणी होईल. - रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: The test can be taken at the driving training institute without going to the RTO to get the driving license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.