Kolhapur: पानसरे खुनात वापरलेली दुचाकी बेळगावमधून जप्त, पंच साक्षीदाराची न्यायालयात साक्ष
By उद्धव गोडसे | Published: April 15, 2024 07:33 PM2024-04-15T19:33:49+5:302024-04-15T19:34:51+5:30
संशयितांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढील तारखेस
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील आरोपींनी वापरलेली दुचाकी बेळगावमधील एका गॅरेजमधून दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केली होती, अशी साक्ष पंच साक्षीदाराने जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी (दि. १५) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, संशयितांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही.
विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर संशयित हल्लेखोर बेळगावच्या दिशेने पळाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने शोध घेऊन बेळगावमधील एका गॅरेजमधून संशयित दुचाकी जप्त केली होती. त्यावेळच्या पंच साक्षीदारांची साक्ष सोमवारी झालेल्या सुनावणीत नोंदवण्यात आली.
साक्षीदाराने त्यावेळचा घटनाक्रम सांगून अटकेतील संशयित भरत कुरणे याच्या भावानेच दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. उलट तपासात बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदारावर प्रश्नांची सरबत्ती करत दुचाकीचा खोटा पुरावा सादर केल्याचे मत मांडले. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे साक्षीदाराने नाकारले. सुनावणीसाठी काही संशयित प्रत्यक्ष, तर काही संशयित व्हीसीद्वारे उपस्थित होते.