अजबच! बेशुध्द रुग्णच धडाधड बोलला; पोलिसाचा महापराक्रम, रुग्णाच्या मृत्यूनंतर खरा प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:01 PM2022-07-05T14:01:30+5:302022-07-05T14:03:54+5:30
मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाने चक्क जबाबही दिला, लेखी जबाबावर सहीसुध्दा केली. असा अजब प्रकार कोल्हापुरात समोर आला
तानाजी पोवार
कोल्हापूर : अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णाने चक्क जबाबही दिला, लेखी जबाबावर सहीसुध्दा केली. असा अजब प्रकार सीपीआर रुग्णालयात घडला. दोन दिवसांनी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर खरा धक्कादायक प्रकार उघड झाला. रुग्ण बेशुध्दावस्थेत असताना तपासातील करवीर पोलीस ठाण्याच्या एका महाप्रतापी पोलिसाने स्वत:च जबाब लिहिला, त्यावर त्या पेशंटच्या नावाची सही करण्यास त्याच्याच जावयाला भाग पाडले. आता रुग्णच मृत झाल्यानंतर घटनेचा उलगडा झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.
एखादा अपघात घडला की अनेकवेळा जखमी आणि आरोपी यांच्यात तडजोड होते, मी स्वत:च गाडीवरून पडलो आदी जबाब देऊन जखमी कोणाविरोधातही तक्रार देत नाहीत; पण कळंबा (ता. करवीर) येथील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या मोपेडवरून आंबेवाडी (ता. करवीर) येथे दिंडीतील वारकऱ्यांना भोजन देण्यासाठी जात होते. वडणगे फाटा येथे त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना बेशुध्दावस्थेत तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
करवीर पोलीस ठाण्यातील पोलीसही चौकशीसाठी आले. त्यावेळी नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी गडबड करत होते. चौकशीसाठी आलेल्या महाप्रतापी पोलिसाने स्वत:च एका कागदावर जबाब लिहिला, त्यामध्ये मी भोवळ आल्याने पडलो, माझी कोणाविरुध्द तक्रार नाही, असा जबाब लिहून त्यावर संबंधित रुग्णाच्या नावे त्याच्याच जावयाला सही करण्यास भाग पाडले.
दरम्यान, खासगी रुग्णालयात रविवारी सायंकाळी संबंधित रुग्ण मृत झाल्याने हा प्रकार उजेडात आला. त्यावेळी, पोलिसाने बेशुध्द रुग्ण असलेल्या माझ्या सासऱ्याचा स्वत:च जबाब लिहून मलाच त्यांच्याच नावे सही करण्यास भाग पाडल्याची तक्रार जावयाने करवीर पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी सायंकाळी केली. त्यामुळे बेशुध्द रुग्णाचा जबाब कसा घेतला? याबाबत वरिष्ठांनी संबंधित पोलिसांची कानउघडणी केली. या खोट्या जबाबाच्या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ माजली.
‘मीच पडलो, माझी काही तक्रार नाही’
संबंधित पोलिसाने चौकशीवेळी लिहिलेच्या जबाबामध्ये, ‘मला अचानक भोवळ आली, मी गाडी पेट्रोलपंपावर थांबवली, भोवळ आल्याने मी खाली पडलो, लोकांनी मला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. आता माझी तब्येत ठीक आहे. वरील घटनेबाबत माझी कोणाविरोधातही तक्रार नाही’ असा जबाब लिहून त्याखाली रुग्णाच्या नावाची सही आहे.