कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:30 PM2022-11-01T13:30:30+5:302022-11-01T13:30:55+5:30
पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १६ साखर कारखाने निवडणुकीस पात्र असून, त्यातील ‘गडहिंग्लज’ व ‘निनाईदेवी’ साखर कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यांच्या सभासदांबाबत न्यायालयाने निकाल दिल्याने ऑक्टोबरमध्ये त्यांची प्रक्रिया सुरू होईल, असे वाटत होते. मात्र मतदार यादीच्या अर्हता दिनांकाबाबत सहकारी प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे.
पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज कारखाना व सांगली जिल्ह्यातील निनाईदेवी साखर कारखान्यांची मतदान प्रक्रिया सुरू आहे. या कारखान्यांची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. येत्या दोन दिवसात कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल.
‘राजाराम’ कारखान्याच्या वाढीव मतदारांबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. या कारखान्यांची मतदार यादीची अर्हता दिनांक किती असावी, याबाबत सहकारी प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे. मात्र अद्याप आले नसल्याने प्रक्रिया थांबली आहे. अर्हता दिनांक आल्यानंतर संलग्न संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव व कारखान्यांकडून सभासद यादी मागवली जाणार आहे. साधारणत: या आठवड्यात अर्हता दिनांक समजले तर याद्या तयार करण्यास किमान महिन्याचा कालावधी जाऊन त्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे ‘राजाराम’चे रणांगण फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होऊ शकते.
साखराळे (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर कारखान्यांकडेही मतदार यादी मागवली आहे. येत्या आठवड्याभरात त्यांची यादी आली की तेही प्रसिद्ध करून हरकतीची प्रक्रिया सुरू हाेईल.
प्रारूप यादी ते मतदानासाठी तीन महिन्याचा कालावधी
प्रारूप यादी प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती, सुनावणी व अंतिम यादी प्रसिद्ध करणे यासाठी दीड महिन्याचा कालावधी जातो. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासाठी तेवढाच कालावधी जात असल्याने प्रारूप यादी ते निकाल येथेपर्यंत किमान तीन महिने लागतात.
‘माणगंगा’कडे निवडणुकीसाठी पैसेच नाहीत
आटपाडी तालुक्यातील माणगंगा साखर कारखाना बंद आहे. निवडणुकीसाठी कारखाना प्रशासनाकडे पैसे नसल्याने या कारखान्यांची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे.
संचालक मंडळाची मुदत संपलेले कारखाने -
कारखाना मुदत संपलेली तारीख
छत्रपती राजाराम, कसबा बावडा २० एप्रिल २०२०
माणगंगा, सोनारसिद्धनगर, आटपाडी २८ मे २०२०
राजारामबापू, साखराळे, वाळवा २९ मे २०२०
निनाईदेवी, कोकरुड, शिराळा ५ ऑगस्ट २०२०
कुंभी कासारी, कुडित्रे, करवीर २८ डिसेंबर २०२०
आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज २९ मार्च २०२१
शेतकरी, कोकळे, मिरज १७ एप्रिल २०२१
सह्याद्री, धामोड, राधानगरी १९ एप्रिल २०२१
जी. डी. बापू लाड, कुंडल, पलूस ६ मे २०२१
इंदिरा गांधी, तांबाळे, भुदरगड १६ मे २०२१
वसंतदादा, सांगली २२ मे २०२१
आजरा, गवसे २३ मे २०२१
हुतात्मा अहिर, वाळवा १६ एप्रिल २०२२
भोगावती, परिते, करवीर २४ एप्रिल २०२२
गायकवाड, सोनवडे, शाहुवाडी १ मे २०२२
सर्वोदय, कारंदवाडी, वाळवा २१ जून २०२२