पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:19 PM2022-09-14T19:19:56+5:302022-09-14T19:20:50+5:30

गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत.

The wall of the historical lake at Panhalgad collapsed | पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली

पन्हाळगडावरील ऐतिहासिक तलावाची भिंत ढासळली

Next

पन्हाळा : पन्हाळा  येथील प्रवेशद्वारावर असणाऱ्या सादोबा तलावाच्या भिंतीचा काही भाग आज पुन्हा ढासळला.  पन्हाळा येथील सादोबा तलाव ऐतिहासिक तळे असून या तळ्याचे बांधकाम आदिलशहाच्या काळात करण्यात आले असल्याची नोंद आहे. या तळ्याच्या संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

सादोबा तळ्याच्यावरील भागात मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. त्याचबरोबर काही भागात लोकवस्तीदेखील आहे. गेल्या तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तळ्याच्या मोटवण नावाच्या भिंतीचा पुढील भाग ढासळला असून ढासळलेला भाग तळ्याच्या मुख्य भिंतीचा आधार होता. आधाराची ही भिंत ढासळल्याने मुख्य भिंती चा भरावदेखील खाली येण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षात तीन वेळा तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यांची डागडुजी केलेली नाही. तसेच तलावाच्या बाजूने जाण्याच्या रस्त्यावरदेखील भिंतीना तडे गेले आहेत. याबाबत देखील पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा तेथील नागरिकांनी नगरपरिषद, पदाधिकारी, अधिकारी यांना तळ्याच्या भिंती दुरुस्ती करावी अशी विनंती केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

राज्य शासनाने सरोवर संवर्धनासाठी पालिकाना निधी दिला होता. या निधीचे काय झाले? असा सवाल नागरिक विचारत आहेत. सादोबा तलावाच्या संरक्षक भिंती तातडीने बांधकाम न केल्यास पूर्ण तलाव लवकरच मुजुन जाइल अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. तलावात महिला कपडे धुण्यासाठी जातात. भिंती ढासळत असल्याने तलावात जाणे धोक्याचे झाले आहे. ऐतिहासिक तलाव दुरुस्तीसाठी शासनाने त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: The wall of the historical lake at Panhalgad collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.