कोल्हापूर: वारणा, कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर; पूरपरिस्थितीचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 08:01 PM2022-07-09T20:01:11+5:302022-07-09T20:01:35+5:30
नदीकाठच्या कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत होण्याच्या सूचना
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागात आज, शनिवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे वारणा व कडवी या दोन्ही नद्यांचे पाणी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडले असून नदीकाठीपूरस्थिती निर्माण झाली आहे.
संततधार पावसामुळे वारणा व कडवी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज, दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्या शेतशिवारातही पावसाचे पाणी साचुन राहीले आहे. मात्र, हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान संभाव्य पूरपरिस्थीतीचा धोका ओळखून नदीकाठच्या कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत होण्यासंदर्भात शाहूवाडी तहसिल कार्यालयाकडून यापुर्वीच नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.