पुरवठा विभागाची महाफूड वेबसाइट दोन महिने बंद, राज्यभरातील कामे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:04 IST2025-01-04T13:03:32+5:302025-01-04T13:04:52+5:30
गौरव सांगावकर राधानगरी (जि. कोल्हापूर ) : गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘महाफुड’ ही ...

पुरवठा विभागाची महाफूड वेबसाइट दोन महिने बंद, राज्यभरातील कामे ठप्प
गौरव सांगावकर
राधानगरी (जि. कोल्हापूर) : गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘महाफुड’ ही वेबसाइट बंद असल्याने शिधापत्रिकेसंबंधित सर्व ऑनलाइन कामे बंद आहेत. त्याचा राज्यभरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या विभागातून नाव वाढवणे, नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, आधारसंबंधित कामे, नवीन शिधापत्रिका देणे, शासकीय विभागातून वैद्यकीय उपचारासाठी पुरवठा विभागातून लागणारे दाखलेही मिळत नसल्याने आरोग्यसंबंधित योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागातील ही सर्वच कामे ठप्प असल्याने सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
काही काळासाठी वेबसाईट चालू असते. यामुळे काहीजणांची कामे अर्ध्यात खोळंबली आहेत. लोक आपल्या शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात; पण सर्व्हर समस्या येत असल्याने काम पूर्ण न झाल्याने पुन्हा सात-आठ दिवसांनी या, असे कर्मचारी सांगतात. पुन्हा आले तरी हीच समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, वेबसाइट अद्याप चालू नसल्याचे सांगण्यात येते.
मात्र, या समस्या निवारणासाठी प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. ‘सर्व्हर डाउन असल्याने आम्ही काय करणार?’ हीच भूमिका तालुक्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. एकाच कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना अनेक हेलपाटे घालावे लागत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १४ कार्यालयांत लोकांना हाच अनुभव येत आहे. ही अडचण लवकर दूर करून नागरिकांना नाहक होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
ही तांत्रिक अडचण असल्याने या संदर्भात मंत्रालयातील संगणक विभागाला वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. वेबसाइट सुरू होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. नवीन सर्व्हरवर काम चालू असून आठ-दहा दिवसांत वेबसाईट सुरळीत सुरू होईल. - मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर