कोल्हापुरातील अंबाबाई भक्तनिवासाचे काम दोन वर्षांपासून रडतखडत सुरु, ठेकेदारास चारवेळा नोटीस
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 27, 2023 07:55 PM2023-02-27T19:55:20+5:302023-02-27T19:56:38+5:30
नोटिसीला अजून ठेकेदाराने उत्तर दिलेले नाही
इंदूमती गणेश
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने कपिलतीर्थ मार्केटच्यासमोर सुरू असलेल्या भक्तनिवास व पार्किंगचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. इमारत उभारण्यासाठी ठेकेदाराला दिलेली मुदत जानेवारीत संपली असून सध्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबची बांधणी सुरू आहे. संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल समितीने यापूर्वी चारवेळा ठेकेदाराला नोटीस दिली आहे. मागील महिन्यात दिलेल्या नोटिशीत काम का वेळेत झाले नाही व दंडात्मक कारवाई का करू नये अशी विचारणा केली आहे. सध्याचा कामाचा वेग पाहता अजून किती वर्षे हे भक्तनिवास असेच रेंगाळणार अशी विचारणा भाविकांतून होत आहे.
देवस्थान समितीच्या २०१०-११ मधील कार्यकारिणीने महालक्ष्मी बँकेची कपिलतीर्थ मार्केटसमोरील ३ हजार १५८ चौरस फूट जागा विकत घेतली. येथे दोन मजले महापालिकेचे पार्किंग, एक मजला देवस्थानचे पार्किंग आणि वरच्या चार मजल्यांवर भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. याचा ठेका शाहुपुरीतील पॅराडाईज डेव्हलपर्स यांना मिळाला असून ४ जानेवारी २०२१ रोजी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली.
काम पूर्ण करण्यासाठी दिलेली २ वर्षांची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपली. दोन वर्षांनंतरही येथील कामाची स्थिती जैसे थे आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये येथे बेसमेंटच्या फ्लोअरचा स्लॅब सुरू होता. २०२२ हे पूर्ण वर्ष संपल्यानंतर आता पहिल्या मजल्याच्या स्लॅबची बांधणी सुरू आहे. दोन वर्षांत फक्त बेसमेंटचे स्लॅब पूर्ण झाले असून यावरून हे काम किती कासवगतीने सुरू आहे याची कल्पना येते.
कोरोनाची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाल्यानंतर ही दोन वर्षे कोरोनात गेली, त्यामुळे २०२१ मध्ये काम होऊ शकले नाही हे कारण रास्त आहे. कारण त्या काळात सगळी कामे ठप्प होती. मात्र २०२२ साली कोरोनाचे सावट नसतानाही कामाची गती वाढवली नाही.
देवस्थानचे हे भक्तनिवास आणि महापालिकेच्यावतीने सरस्वती टॉकीज येथे उभारण्यात येत असलेले पार्किंग व भक्तनिवासाचे काम एकाच काळात सुरू झाले. महापालिकेची इमारत उभी राहिली आहे, इथे मात्र पहिला मजला तयार झालेला नाही.
काम पूर्ण करायचे आहे की नाही?
याबाबत समितीने दिलेल्या माहितीनुसार मुदत संपल्यानंतरही ठेकेदाराने मुदतवाढीचा प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे ९ जानेवारीला नोटीस काढण्यात आली. यात दिलेल्या मुदतीत काम पूर्ण का झाले नाही, तसेच काम मुदतीत न झाल्याने नियमानुसार दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करण्यात आली आहे. या नोटिसीला अजून ठेकेदाराने उत्तर दिलेले नाही. मुदतवाढही मागितलेली नाही याचा अर्थ त्यांना काम करायचे नाही का? नसेल त्यांनी तसे देवस्थानला स्पष्ट करणे गरजेचे आहे. भाविकांची गैरसोय होत असताना काम रखडविण्याऐवजी दुसरा ठेकेदार नेमता आला असता.