कोल्हापुरात भाजप मोडीत काढण्याचे काम, बाबा देसाई यांचा आरोप
By समीर देशपांडे | Published: October 5, 2023 04:25 PM2023-10-05T16:25:25+5:302023-10-05T16:26:16+5:30
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही केली टीका
कोल्हापूर : नव्या, जुन्या भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी अशी एक यंत्रणा भाजपमध्ये होती; परंतु हीच यंत्रणा सध्या पक्षात राहिली नसून कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच भाजप मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते बाबा देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
देसाई म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दौऱ्यावर येत आहेत. आमची भेट घालून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जर त्यांनी नव्याने केलेल्या कार्यकारिणी रद्द करून पुनर्रचना करण्याची मागणी मान्य नाही केली तर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. समरजित घाटगे भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून पक्षात मोडतोडीला सुरुवात झाली. काही जण पक्षाचे सदस्य नसतानाही पदाधिकारी झाले.
नव्या निवडीत काही पदाधिकाऱ्यांच्या नावासमोर चंद्रकांत पाटील यांनी खाट मारली. अशाने पक्ष संपत चालला असून भाजप पक्ष वाचविण्यासाठी आम्ही जुने कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. यावेळी माजी संघटनमंत्री शिवाजी बुवा, माजी जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव, अनिल देसाई, एकनाथ पाटील, तानाजी कुरणे, अजितसिंह चव्हाण उपस्थित होते.