सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकरण दिवाळीला सुरू, नितीन गडकरींनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:25 PM2022-08-05T14:25:17+5:302022-08-05T14:26:32+5:30
कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बहुचर्चित बास्केट ब्रीज होणार असल्याचे महाडिक यांनी नमूद केले
कोल्हापूर : सातारा-कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम दिवाळीच्या दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत देण्यात आली. महाराष्ट्रातील महामार्गांच्या कामाबाबत राज्यातील सर्व खासदारांची बैठक झाली. त्यास खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, सांगलीचे संजयकाका पाटील, साताऱ्याचे श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले उपस्थित होते. गडकरी यांनी राज्यातील नव्या महामार्गांच्या बांधणीचा आढावा घेतला.
या बैठकीत खासदार महाडिक यांनी, सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम रखडले असल्याबद्दल लक्ष वेधले. सर्वाधिक वर्दळ असलेल्या या महामार्गाचे सहापदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी मांडली. त्यावर गडकरी यांनी या कामाबाबतची सध्यस्थिती सांगितली. सातारा ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १२ कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कामाला दिवाळीच्या दरम्यान प्रत्यक्ष सुरुवात होईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
बास्केट ब्रीज होणारच
कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बहुचर्चित बास्केट ब्रीज होणार असल्याचे महाडिक यांनी नमूद केले आहे. या कामाचा याच सहापदरीकरणाच्या कामात समाविष्ट आहे. त्यामुळे बास्केट ब्रीजचे कामही लवकरच सुरू होणार आहे. हा बास्केट ब्रीज पूर्ण झाल्यावर महापुराच्या काळातही, महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील. शिरोली नाक्याकडून कोल्हापुरात प्रवेश करताना, प्रशस्त रस्ता तयार होईल. त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. गडकरी यांनी या कामाकडे विशेष लक्ष दिल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.