कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावच्या जलजीवन योजनांचा 'नारळ'च नाही फुटला, १२ कोटींचा निधी मंजूर

By समीर देशपांडे | Published: December 3, 2024 05:19 PM2024-12-03T17:19:49+5:302024-12-03T17:20:34+5:30

शिरोळमधील पाच गावच्या पुन्हा निविदा

The work of Rs 12 crore Jaljeevan Yojana of 9 villages in Kolhapur district has not started yet | कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावच्या जलजीवन योजनांचा 'नारळ'च नाही फुटला, १२ कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावच्या जलजीवन योजनांचा 'नारळ'च नाही फुटला, १२ कोटींचा निधी मंजूर

समीर देशपांडे

कोल्हापूर : एकीकडे लवकरात लवकर जलजीवन मिशनमधील पाणी योजना पूर्ण व्हाव्यात यासाठी केंद्र शासन आग्रही असताना कोल्हापूर जिल्ह्यातील ९ गावांच्या १२ कोटी रुपयांच्या योजनांच्या कामाला सुरुवातच झालेली नाही. यामध्ये शिरोळ तालुक्यातील पाच गावांचा समावेश असून या पाच योजनांसाठी आता फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. स्थानिक प्रश्न निर्माण झाल्याने ठेेकेदारांनी काम सुरूच न करणे पसंद केल्याचे सांगण्यात आले. यातील काही योजना मंजूर होऊन दीड, दोन वर्षे झाली आहेत.

जिल्ह्यात १ हजार २११ योजना करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील ४१६ योजना पूर्ण झाल्या आहेत. ३६ योजनांचे २५ टक्के काम झाले असून १३२ योजनांचे २५ ते ५० टक्के काम झाले आहे. ६१८ योजनांचे ५० टक्क्यांहून ९९ टक्केपर्यंत काम झाले आहे. परंतू शिरोळ तालुक्यातील लाटवाडी १ कोटी, अब्दुललाट २ कोटी ५ लाख, शिवनाकवाडी १ कोटी ८७ लाख, घोसरवाड १ कोटी २८ लाख, गौरवाड ८७ लाख अशा पाच योजनांचे कामच सुरू झालेले नाही. तालुक्याच्या नेतृत्वाशी मतभेद झाल्याने ठेकेदार ही कामेच सुरू करण्यासाठी न गेल्याचे सांगण्यात आले. आता या पाचही योजनांच्या ठेकेदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत.

पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे १ कोटी ५५ लाखांची योजना मंजूर झाली होती. परंतु नोव्हेंबर २३ला मंजूर या योजनेचे ठेकेदाराने कामच सुरू केलेले नाही. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावासाठी १ कोटी ६७ लाख रुपयांची योजना मंजूर झाली. परंतु या योजनेतून संभाव्य लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होणार नसल्याने नवी मोठी योजना आखण्यात आली असून तिच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावासाठी १ कोटी ५ लाखांची तर हासूर सासगिरीसाठी ८९ लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु स्थानिक अडचणींमुळे या दोन्ही याेजनांची कामे सुरू झालेली नाहीत.

५० कोटींचा निधी आवश्यक

ज्याप्रमाणे योजनांची बिले दाखल केली जातील त्यानुसार शासनाकडून रक्कम अदा करण्यात येत आहे. सध्या ५० कोटी रुपयांची बिले दाखल करण्यात आली आहेत. याआधी १४ ऑक्टोबरला सात कोटींचा निधी आधीच्या बिलांसाठी उपलब्ध झाला होता.

मंजूर जलजीवन मिशन योजना

  • चंदगड - १६९
  • शाहूवाडी - १३७
  • पन्हाळा - १२३
  • करवीर - १२०
  • गडहिंग्लज - १०८
  • राधानगरी - १०८
  • भुदरगड - १०५
  • कागल - ९८
  • आजरा - ८३
  • हातकणंगले - ६७
  • शिरोळ - ५२
  • गगनबावडा ४१

Web Title: The work of Rs 12 crore Jaljeevan Yojana of 9 villages in Kolhapur district has not started yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.