कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास

By भारत चव्हाण | Published: October 19, 2023 12:15 PM2023-10-19T12:15:39+5:302023-10-19T12:17:50+5:30

पुईखडी केंद्राला जलवाहिनी जोडली : कसबा बावड्याकडे जाणाऱ्या वाहिनीचे काम आज पूर्णत्वास

The work of supplying water to Kolhapur city through direct pipeline from Kalammawadi Dam is complete | कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास

कोल्हापूरकरांसाठी आनंदवार्ता!; स्वप्न सत्यात उतरले, थेट पाइपलाइन पूर्णत्वास

कोल्हापूर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ती वेळ आली. ‘काम लई अवघड हाय’ या प्रारंभीच्या प्रतिक्रियेनंतर काम होणार की नाही अशा शंका कुशंकांनी काहूर माजविला असताना खरंच तो सोनियाचा दिन अखेर उगवला. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइनने पाणी देण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राला जलवाहिनी जोडण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले आणि कसबा बावड्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम जोडण्याचे कामही आज, गुरुवारपर्यंत पूर्ण होईल.

एकीकडे काळम्मावाडी योजनेचे काम पूर्ण होत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहरवासीयांच्या ३२ वर्षांपासूनची मागणीही पूर्ण होत असल्याचा आनंद नक्कीच कोल्हापूरकरांना आहे. शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, त्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन टाकावी, अशी मागणी सन १९९० च्या सुमारास झाली. पुढे पंधरा- वीस वर्षे नुसती आंदोलने झाली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळे भेटली. नुसतीच आश्वासने आणि तोंडाला पाने पुसण्यातच राज्य सरकारने धन्यता मानली.

सन २०१२ नंतर या योजनेच्या कामाला गती मिळाली. ‘योजना मंजूर झाली नाही तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही’ अशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तसेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने २०१४ मध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. बत्तीस वर्षांचा संघर्ष आणि नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले. आता केवळ स्विच ऑन करून कोल्हापूरकरांना योजनेचे पाणी सोडायचे आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचे लोकार्पण करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दिवाळीचे अभ्यंगस्नान नव्या पाण्याने होणार आहे यात आता किंतु राहिलेला नाही.

जलवाहिनीचे शेवटचे दोन क्रॉस जोडण्याचे काम दोन दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. पुईखडी येथील क्रॉस जोडण्यात आला, त्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. आता फुलेवाडी येथील माजी नगरसेवक राहुल माने यांच्या शेतात एक क्रॉस जोडण्याचे काम सुरू आहे. ते आज, गुरुवारी पूर्ण होत आहे.

महावितरणचे आवाहन

दरम्यान, थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेकरिता ३३ केव्ही केएमसी काळम्मावाडी एक्स्प्रेस वीज वाहिनी, २२० केव्ही ब्रिदी उपकेंद्र ते काळाम्मावाडी धरणापर्यंत उभारण्यात आली आहे. ही विद्युतवाहिनी ब्रिदी, मुदाळतिट्टा, सरवडे, उंदरवाडी, पंडेवाडी व काळम्मावाडी इत्यादी गावांमधून जाते. ही विद्युतवाहिनी १७ ऑक्टोबर २०२३ नंतर केव्हाही विद्युत भारीत करण्यात येईल किंवा त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युतवाहिनी जवळून उंच लोखंडी वस्तू, लांब शिडी इत्यादी नेऊ नये. तसेच, नवीन विद्युत वाहिनीच्या खाबांना व तारांना जनावरे बांधणे यासारखे प्रकार करू नयेत, असे आवाहन महावितरण कंपनी ग्रामीण विभाग २ यांनी केले आहे.

थेट पाइपलाइन 

  • योजनेला मंजुरी : २०१४
  • योजनेचा एकूण खर्च : ४८५ कोटी
  • एकूण जलवाहिनी : ५२ किलोमीटर
  • विद्युतवाहिनी लाइन : ३५ किलोमीटर
  • जॅकवेलची उभारणी : ०२
  • ९४० एचपी क्षमतेचे पंप : ०४
  • ब्रेकप्रेशर टँकची उभारणी : ०१
  • ८० एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र : ०१
  • पुईखडी येथून कसबा बावड्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी
  • २०४० सालापर्यंत पाण्याची गरज भागणार

Web Title: The work of supplying water to Kolhapur city through direct pipeline from Kalammawadi Dam is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.