Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 7, 2025 16:34 IST2025-01-07T16:34:09+5:302025-01-07T16:34:45+5:30

सर्व्हरचा ताप, मनुष्यबळाचा अभाव

The work of the food grain distribution department in Kolhapur is distressing to the citizens | Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

इंदुमती गणेश

कोल्हापूर : येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातील काम तीन महिने थांब अशी स्थिती आहे. गेले दाेन महिने आरसीएमएस आणि आधार सर्व्हरने मान टाकली आहे. कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी धरून मोजून चार जण, नागरिकांचे येणारे अर्ज महिन्याला २ हजार, मदतनिसांवर भार त्यामुळे कोणताही अर्ज किमान दोन-तीन महिन्यांआधी निकालीच निघत नाही असाच या कार्यालयाचा अनुभव आहे. त्याचा नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे. हेलपाटे मारून त्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर हे कार्यालय स्वतंत्र करून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

या कार्यालयात लोकांना फारच हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ला समजली होती. म्हणून प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन नेमकी वस्तुस्थिती समजून घेतली. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडे चार लाख होती. आता १४ वर्षांनंतर ती साडे सहा ते सात लाखांवर गेली आहे. शासनाने महसूल अंतर्गत अन्नधान्य वितरण कार्यालयाला दिलेले मनुष्यबळ ४ लाख लोकसंख्येचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढायला हवी होती. प्रत्यक्षात २०२२ च्या आकृतीबंधात आहे हे मनुष्यबळदेखील कमी केले आहे. एक अर्ज निकाली लागायला किमान २ ते ३ महिने लागतात.

ऑनलाइन कारभार कमी, त्रासच जास्त

धान्यवाटपात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व कामकाज ऑनलाइन आणले ही बाब चांगली असली तरी त्यात काम कमी आणि त्रासच जास्त आहे. आरसीएमएस ही यंत्रणा गेले दोन महिने बंद-चालू होत आहे. ती सुरू झाली तोपर्यंत आधार लींकिंग सर्व्हर बंद पडला आहे. हे दोन्ही सर्व्हर एकाचवेळी सुरू राहतील त्याचवेळी ऑनलाइन काम करता येते. सोमवारी आरसीएमएसमध्ये सुरू होते; पण, आधार बंद पडली होती.

सध्याचे मनुष्यबळ

  • प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी
  • एक पुरवठा निरीक्षक (हेच सध्या गोदामाचे काम बघतात.)
  • दोन क्लार्क
  • चार जण येथे मदतनीस म्हणून काम करतात.
  • एक महिला उमेदवार आहे.


या कार्यालयातील एका एजंट कम मदतनीस कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला की वरून फोन येतो. किंवा संघटनांना हाताशी धरून आंदोलनाचा स्टंट केला जातो. आणखी एका व्यक्तीबाबत अशाच अनेक तक्रारी होत्या त्याला काढून टाकण्यात आले आहे. मूळ पोस्टिंग करमणूक विभागाची असलेले प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून नितीन धापसे पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील एजंटगिरी रोखण्याचा आणि कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही.

मदतनिसांची मदत

येथे काम करीत असलेल्या दोन जणांना तुम्ही कर्मचारी किंवा एजंट आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही दोन्हीही नाही. मदतनीस म्हणून काम करतो. मिळतील तेवढे मानधन, रक्कम घेतो.

धान्यासाठी सर्वाधिक अर्ज

या कार्यालयाकडे नवीन रेशन कार्ड काढणे, नाव कमी - जास्त करणे, पत्ता बदलणे यासह विविध दुरुस्त्या असे विविध प्रकारचे अर्ज येतात. पण, सर्वाधिक अर्ज हे धान्य सुरू करण्याचे व ऑनलाइन शिधापत्रिका करून १२ अंकी नंबरसाठीचे येतात. या अर्जावर आरोग्य सुविधा मिळत असल्याने १२ अंकीसाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शिधापत्रिकांच्या कामात सर्व्हरचा मोठा अडथळा होत आहे. अर्ज आल्यापासून तीन दिवसांत शिधापत्रिका द्यायची योजना आहे. मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. तुलनेने येणाऱ्या अर्जांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रणा कमी पडते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्यात मर्यादा येतात. - नितीन धापसे पाटील, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी

Web Title: The work of the food grain distribution department in Kolhapur is distressing to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.