Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:04 IST2025-02-26T18:02:59+5:302025-02-26T18:04:59+5:30

प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नाही

The work to replace the 18 km long water channel that supplies water to Ichalkaranji city is incomplete even after 15 years | Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना

Kolhapur: इचलकरंजीकर तहानलेलेच; १८ किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचे काम १५ वर्षे झाली तरी पूर्ण होईना

अरुण काशीद

इचलकरंजी : शहराला पाणीपुरवठा करणारी १८ किलोमीटर लांबीची कृष्णा जलवाहिनी बदलण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला तरीही अद्याप काम अपूर्णच आहे. ठेकेदारांवर अंकुश नाही, प्रशासनातील दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा नसल्यामुळे इतका मोठा कालावधी लागला. पाणी-पाणी म्हणून जनता टाहो फोडत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला कोणतेच सोयरसूतक नसल्याचे दिसून येते.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा पाणी योजना मंजूर झाली. त्यासाठी मजरेवाडी (ता.शिरोळ) येथून इचलकरंजी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत १८.३०० किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीस वारंवार गळती लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून तीन टप्प्यांमध्ये ५७ कोटी ६२ लाख रुपये दिले. मात्र, या योजना पूर्ण करण्यासाठी तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला.

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा, दुसऱ्या टप्प्यातील कामास सात वर्षांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू करून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे तरी अद्याप काम पूर्णत्वास गेले नाही. अजूनही पहिल्या टप्प्यातील २५१ मीटर व दुसऱ्या टप्प्यातील १६०० मीटरची जलवाहिनी टाकणे बाकी आहे. सर्वाधिक कालावधी हा दुसऱ्या टप्प्यातील कामास लागला आहे.

या पंधरा वर्षांमध्ये तीन लोकसभेच्या आणि तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी जलवाहिनीचे भिजत घोंगडं आहे तसंच भिजत आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी मुदत देण्यात आली तरीही लवकर काम पूर्ण करता आले नाही. काही वेळेला प्रशासकीय दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागला, तर काहीवेळा अन्य विभागाची परवानगी आणण्यासाठी ठेकेदाराला कसरत करावी लागली.

प्रशासनाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याचे चित्र या योजनेदरम्यान दिसले तसेच योजना मंजूर करून आणण्यापलीकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले नाही. रक्कम मंजूर करून आणली, माझे काम संपले, अशीच भूमिका लोकप्रतिनिधींची दिसते.

जलवाहिनी कामाचा लेखाजोखा

टप्पा क्रं. १

योजनेचे नाव - महाराष्ट सुजल व निर्मल अभियान.
मंजूर रक्कम - १९ कोटी ५३ लाख.
कामाचा आदेश - २५ ऑक्टोबर २०११.
बदलण्यात आलेली जलवाहिनी - ६.६०० किलोमीटर.
काम पूर्ण - १ जुलै २०१४.
लागलेला कालावधी - तीन वर्षे

टप्पा क्रं. २
योजनेचे नाव - महाराष्ट सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान.
मंजूर रक्कम - १६ कोटी ९८ लाख.
कामाचा आदेश - १७ जुलै २०१९.
बदलण्यात आलेली जलवाहिनी - ५.८९६ किलोमीटर. (६.२०० किलोमीटर जलवाहिनी टाकणे.)
काम पूर्ण - अद्याप २५१ मीटर बदलण्याचे काम बाकी.
लागलेला कालावधी - सात वर्षे.

टप्पा क्रं.३
योजनेचे नाव - महाराष्ट सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान.
मंजूर रक्कम - २१ कोटी ११ लाख.
कामाचा आदेश - २० जून २०२३.
बदलण्यात आलेली जलवाहिनी - ३.९०० किलोमीटर. (५.५०० किलोमीटर जलवाहिनी टाकली)
काम पूर्ण - १० मार्च २०२५ अखेर मुदतवाढ जुलै २०१४.
लागलेला कालावधी - अद्याप काम अपूर्ण

Web Title: The work to replace the 18 km long water channel that supplies water to Ichalkaranji city is incomplete even after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.