नाटक सेन्सॉरशिपची ऐशी-तैशी-- मराठी रंगभूमी दिनविशेष

By Admin | Published: November 5, 2014 12:19 AM2014-11-05T00:19:05+5:302014-11-05T00:23:39+5:30

ेसेन्सॉरशिपलाच कात्री : व्यावसायिकपणामुळे द्विअर्थी संवाद, आक्षेपार्ह दृश्यांचे वाढते प्रस्थ

Theater censorship of Aishi-Taishi - Marathi Theater day special | नाटक सेन्सॉरशिपची ऐशी-तैशी-- मराठी रंगभूमी दिनविशेष

नाटक सेन्सॉरशिपची ऐशी-तैशी-- मराठी रंगभूमी दिनविशेष

googlenewsNext

रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांमधील आक्षेपार्ह संवाद किंवा दृश्यांमुळे कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी नाटकांनाही सेन्सॉरशिप आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत रंगभूमीवर ज्या पद्धतीने अश्लील संवाद किंवा आक्षेपार्ह दृश्ये सादर केली जात आहेत, त्यावरून नाट्यसृष्टीत सेन्सॉरच्या कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अभिनयाचे प्रकार आणि त्याचे खेड्यापाड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत होणारे सादरीकरण, यावर नियंत्रण कसे ठेवणार, हादेखील मोठा प्रश्न आहे.
इंदुमती गणेश- कोल्हापूर-- कोणत्याही कलाकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये, धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, द्विअर्थी, अश्लील संवाद अथवा दृश्यांचे विपरीत परिणाम होऊ नयेत, यासाठी चित्रपटांप्रमाणेच नाटकांनाही सादरीकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. साधारणत: २५-३० वर्षांपूर्वी ‘जंगली कबुतर’ हे नाटक कोल्हापूरकरांनी बंद पाडले होते. काही वर्षांपूर्वी आलेले ‘अहो, मी तुमचीच’ किंवा अलीकडेच दोन कलाकारांच्या संवादात्मक रूपात ‘एक चावट संध्याकाळ’ अशी काही नाटके सादर झाली आहेत. अशा काही नाटकांना ‘ए ग्रेड’ दिलेली असते. त्याव्यतिरिक्त सादर होणाऱ्या हौशी अथवा व्यावसायिक नाटकात एखादा हॉट सीन असेल किंवा विनोदाच्या नावाखाली द्विअर्थी वा अश्लीलतेकडे झुकणारे संवाद असले की नाटकांना गर्दी होते, या मानसिकतेतून निर्माण झालेला तद्दन व्यावसायिकपणा हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी रंगभूमीतही शिरला आहे.
समाजाचे वास्तव मांडणारी धाडसी नाटके वादग्रस्त ठरली तरी ती कलात्मकतेच्या चौकटीत होती. आता मात्र तसे होत नाही. त्यामुळे सेन्सॉर बोर्डमधील तज्ज्ञांनी संहितेचे व्यवस्थित वाचन, सादरीकरण आणि त्या नाटकाची गरज लक्षात घेतली नाही तर एखाद्या वेळी त्या कलाकृतीवर अन्यायही होऊ शकतो. आता अगदी गणेशोत्सवापासून ते खेड्यापाड्यांतील जत्रेपर्यंत हजारोेंच्या संख्येने, जमेल त्या पद्धतीने नाटकांचे सादरीकरण केले जाते. या सगळ्यांवर सेन्सॉर बोर्ड नियंत्रण कसे ठेवणार, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
वास्तव की प्रसिद्धी ?
मराठी रंगभूमीला एक मोठी परंपरा आहे. या क्षेत्राने स्वातंत्र्यसंग्रामातील सहभागापासून ते समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून सशक्तपणे आपली भूमिका बजावली आहे.
सखाराम बार्इंडर, गार्बो, मित्राची गोष्ट अशा वादग्रस्त नाटकांनी धाडसाने बोल्ड आणि गंभीर विषय हाताळले. कलात्मकतेचे भान ठेवून त्यांनी समाजाचा एक चेहरा रंगभूमीवर आणला.
काळानुरूप समाजाचे वास्तव मांडताना कलाकृतीत बदल होणे अपेक्षित असतेच. मात्र, हा बदल संवाद ऐकताना किंवा रंगमंचावरील सादरीकरण बघताना प्रेक्षकाला खजिल करणारा, लज्जास्पद वाटणारा नसावा, असा एक संकेत आहे.
प्रसिद्धी आणि उत्पन्नाच्या गणितात मात्र हे संकेत कुठेच बसत नाहीत.
अशाही पळवाटा
प्रायोगिक अथवा व्यावसायिक नाटकांच्या प्रत्येक प्रयोगाला सेन्सॉर बोर्डमधील किमान एक व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक असते; किंबहुना त्यांच्यासाठी जागा राखीव असते. मात्र, नाटकांची संख्या बघता हे शक्य नाही; त्यामुळे संहिता सेन्सॉर बोर्डाला पाठवून ती संमत करून घ्यावी लागते. मात्र, एकदा बोर्डाची मान्यता मिळाली की संहिता आणि प्रत्यक्ष सादरीकरण यांत फेरफार केले जातात. असे प्रकार टाळण्यासाठी प्रत्यक्ष सादरीकरणावेळी उपस्थित राहून संवादाचे नेमके स्वरूप आणि विषयाचे गांभीर्य पाहणे आवश्यक आहे.

केवळ विनोदासाठी विनोद म्हणून नाटकात विकृतिजन्य संवाद किंवा दृश्ये असू नयेत. संहितेच्या गरजेनुसार एखाद्या दृश्यातून अर्थ निर्माण होणार असेल तर बोल्ड दृश्य असायलाही हरकत नाही; पण त्याची कलात्मकता जपली गेली पाहिजे. सेन्सॉरने सुचविलेल्या बदलांमध्येही अनेकदा परस्पर फेरफार केले जातात; त्यामुळे नाटक सादर करणाऱ्यांनी याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे.
- डॉ. शरद भुताडिया

(ज्येष्ठ रंगकर्मी)नाटकांनी प्रेक्षकाचे मनोरंजन करताना त्यांचे प्रबोधन किंवा एका नवा संस्कार रुजविण्याचेही कार्य केले आहे. त्याला बाजारी स्वरूप प्राप्त होऊन नाटकाला पैसा व प्रसिद्धीचे माध्यम म्हणून रंगभूमीवर आणणे म्हणजे त्या कलाकृतीचा अपमान ठरतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने याविरोधात कडक धोरण अवलंबावे, अशी अपेक्षा आहे.
- प्रशांत जोशी
(प्रतिज्ञा नाट्यरंग)

Web Title: Theater censorship of Aishi-Taishi - Marathi Theater day special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.