कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नांगनूर शाखेत चोरी; १६ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 12:06 PM2023-08-07T12:06:12+5:302023-08-07T12:06:33+5:30
५.८६ रोकडसह १८ तोळ्यांचे दागिने गायब
हलकर्णी (जि. कोल्हापूर) : नांगनूर (ता. चंदगड) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसह पोस्ट ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. बँकेतील पाच लाख ८६ हजार रोकडसह १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तर पोस्ट ऑफिसमधील ६,३०० रुपयांची रोकड मिळून १६ लाखांचा ऐवज लांबविला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली.
नांगनूर येथे तानाजीराव मोकाशी सहकारी दूध संस्थेच्या मालकीच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हा बँकेची शाखा, पोस्ट कार्यालय व महावितरण कंपनीचे कार्यालय एकमेकांना लागून आहेत. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी इमारतीच्या तळमजल्यावरील लोखंडी मुख्य दरवाजाचे कुलूप आणि बँकेच्या व पोस्ट कार्यालयाच्या दरवाजांची कुलपे कटरने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
बँकेच्या स्ट्राँग रूमच्या दरवाजाचे कुलूप कटरने तोडले आणि लोखंडी तिजोरीचे कुलूप डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने उघडून, त्यातील रोख ५ लाख ८६ हजारांसह ग्राहकांनी तारण ठेवलेले १८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविले. त्यानंतर, पोस्टाची तिजोरी हातोडीने फोडून त्यातील ६,३०० रुपये लांबविले. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वीज वितरणचे कर्मचारी ऑफिसकडे गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्याने बँकेच्या व पोस्टाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती दिली.
कॅमेरे फिरविले, ‘डीव्हीआर’ फोडला!
नांगनूर ग्रामपंचायतीने दूध संस्थेच्या इमारतीच्या बँकेकडे जाणाऱ्या जिन्यावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. चोरी करून परतताना ‘सीसीटीव्ही’तील माहिती संकलित करणारे ‘डीव्हीआर’ मशीनही स्ट्राँग रूमच्या खोलीत नेऊन फोडून टाकल्याचे पंचनाम्यात निदर्शनास आले. पोलिसांनी तो ‘डीव्हीआर’ ताब्यात घेतला आहे.