चोरी प्रकरण; दोषी पोलिसांची गय नाही

By admin | Published: April 20, 2017 01:37 AM2017-04-20T01:37:31+5:302017-04-20T01:37:31+5:30

दीपक केसरकर : रॅकेटमध्ये कितीही मोठा पोलिस अधिकारी असो, कठोर कारवाई होणार

Theft Case; The guilty police are not allowed | चोरी प्रकरण; दोषी पोलिसांची गय नाही

चोरी प्रकरण; दोषी पोलिसांची गय नाही

Next

कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी रॅकेटमध्ये कितीही मोठा पोलिस अधिकारी असो, त्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
वारणा शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणात सांगली पोलिसांनी नऊ कोटी रुपये लाटले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात पोलिसांना निलंबित केले. पोलिस दलामध्ये वातावरण गरम असताना बुधवारी गृहराज्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आले. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, कुठल्याही शासकीय विभागात चांगले-वाईट लोक असतात. अशा तऱ्हेच्या लोकांचे प्रमाण एक-दोन टक्क्यांवर असते. गृहविभागामध्ये कुठल्याची भ्रष्ट, वाईट गोष्टींना पाठीशी घातले जात नाही. माझी खात्री आहे, जे कोणी पोलिस अधिकारी, कर्मचारी या चोरी प्रकरणात सहभागी असतील त्यांचा शोध घेतला जाईल. या रॅकेटमध्ये कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याची तमा बाळगली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करून सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले जाईल. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, त्याचा पोलिस अभ्यासपूर्वक तपास करत आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांची या प्रकरणी भेट घेऊन आरोपींना शिक्षा लागेल, अशी कारवाई करण्याची मागणी केली जाईल.


माहिती घेऊन बोलतो
‘वारणे’च्या चोरी प्रकरणात तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचाही हात असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे केली. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, काही गुन्ह्णांमध्ये बोलता येत नाही. तपास हा गोपनीय पातळीवर केला जातो. यासंबंधी सखोल माहिती घेऊन पुन्हा एकदा मी कोल्हापूरला येऊन माहिती देईल, असे उत्तर दिले.


कोल्हापुरातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणात सहभागी असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधीकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिले.

Web Title: Theft Case; The guilty police are not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.