पूरग्रस्तांच्या घरी चोरी, चार लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:45 AM2019-08-16T10:45:56+5:302019-08-16T10:47:13+5:30
महापुराचे पाणी चिखली, लक्ष्मीपुरी येथे आल्याने घरे बुडाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस व चिखली (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर : महापुराचे पाणी चिखली, लक्ष्मीपुरी येथे आल्याने घरे बुडाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस व चिखली (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
पंचगंगेला आलेल्या महापुरात चिखली, आंबेवाडी गावे पाण्याखाली गेली होती. तसेच जयंती नदीला आलेल्या महापुरात लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसर पाण्याखाली गेला होता. येथील अमोल मनोहर कांबळे (वय ३५) यांचे रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस शेजारी घर आहे. पुराचे पाणी घरी आल्याने त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम लोखंडी तिजोरीत ठेवून घर बंद करून श्रमिक हॉल येथे राहण्यासाठी गेले होते.
पाणी ओसरल्यानंतर ते कुटुंबासह घरी गेले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामध्ये १८ हजार रोकड, सोन्याचे गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, वेलजोड, कर्णफुले, चेन, अंगठ्या असे १२ तोळे दागिने, चांदीच्या वस्तू असा सुमारे अडीच लाख किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
चिखली येथील नितीन नाना कांबळे (३५) यांच्याही घरी पाणी आल्याने ते स्थलांतरित झाले होते. पाणी ओसरल्यानंतर ते घरी गेले असता दरवाजा मोडलेला दिसला. ३५ हजार रोकड, सोन्याची चेन, वळे, बदाम, चांदीचे ब्रेसलेट, करदोडा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली.
महापुरात अडकलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष केले. कसबा बावडा येथून ८० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. आठ ते दहा घरे फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलीस गस्त घालत असले तरी चोरट्यांनी घरे फोडून त्यांना आव्हान दिले आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांत भीती पसरली आहे.