मोलकरणीच्या घरी संसारोपयोगी साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:19 AM2021-07-15T04:19:11+5:302021-07-15T04:19:11+5:30
कोल्हापूर : दुसऱ्यांच्या घरी काम करून घरच्या संसाराचा गाडा चालविणाऱ्या मोलकरणीच्याच घरी चोरीचा प्रकार घडला. चोरट्याने त्यांच्या घरातील भांडी, ...
कोल्हापूर : दुसऱ्यांच्या घरी काम करून घरच्या संसाराचा गाडा चालविणाऱ्या मोलकरणीच्याच घरी चोरीचा प्रकार घडला. चोरट्याने त्यांच्या घरातील भांडी, नवीन अंथरुण-पांघरुण, नवीन साड्या, आदी सुमारे साडेपाच हजारांच्या संसारोपयोगी साहित्याची चोरी केली. ही घटना करवीर तालुक्यातील केर्ली येथे घडली. याबाबत कांचन सोपान कांबळे (वय ५७, रा. केर्ली, सध्या रा. उमा चित्रमंदिरानजीक, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांचन कांबळे ह्या धुण्याभांड्याची कामे करतात. त्या सध्या कोल्हापूर शहरात उमा चित्रमंदिरानजीक राहतात. त्यांच्या केर्ली येथील घरी दि. २७ मे ते १४ जुलै या कालावधीत चोरीचा प्रकार घडला. अज्ञात चोरट्याने दोन पितळी घागरी, तीन पितळी ताटे, एक स्टीलचे पिंप, एक लोखंडी खाट, ॲल्युमिनियमचे दोन तवे, तीन कुकर, स्वयंपाकांची भांडी, नवीन अंथरुण-पांघरुण, नवीन साड्या असे सुमारे साडेपाच हजारांचे साहित्य चोरून नेले. याबाबत त्यांनी बुधवारी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.