कणेरी मठावरील चोरीचा छडा
By admin | Published: March 6, 2016 01:06 AM2016-03-06T01:06:49+5:302016-03-06T01:06:49+5:30
चोरट्यास अटक : ५१ लाखांचा ऐवज जप्त; एवढी रक्कम आली कोठून याची चौकशी
कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील परमपूज्य अदृश काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठावरील जुन्या निवासस्थानात झालेली चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने उघडकीस आणली. याप्रकरणी अट्टल चोरटा लखन कृष्णा माने (वय २२, रा. वंदूर, ता. कागल) याला अटक केली. त्याच्याकडून ‘अदृश्य’ झालेली रोख रक्कम ४९ लाख, सहा तोळे सोने व दोन तोळे चांदीचे दागिने (नाणी) असा सुमारे ५१ लाख ४६ हजार ७६६ रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस रेकॉर्डला साडेआठ लाखांची नोंद असताना प्रत्यक्षात अर्धा कोटी रुपये सापडल्याने इतकी मोठी रक्कम कोठून आली, याची माहिती पोलीस घेत असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते व कर्मचारी उपस्थित होते. (पान १ वरून) कणेरी मठावर ब्रह्मलीन काडसिद्धेश्वर स्वामींचे नैसर्गिक, दगडांच्या रचनेने बनलेले सात खोल्यांचे निवासस्थान आहे. २८ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी येथील खोल्यांचे कडी-कोयंडे व कुलपे उचकटून लोखंडी तिजोरीतील रोकड व इतर साहित्य लंपास केले होते. मठाचे सेवेकरी भास्कर केसरकर यांनी याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी फिर्यादी केसरकर यांच्या जबाबानुसार रोख साडेआठ लाख रुपयांची चोरी झाल्याची पोलीस रेकॉर्डला नोंद केली.
या प्रकाराने मठाच्या परिसरातील लोकांच्या व भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना या गुन्ह्णाचा समांतर तपास करून गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार पोलीस दिवस-रात्र परिसरात गस्त घालून चोरट्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. मठावरील काही कर्मचाऱ्यांकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात आली; परंतु कोणतेच धागेदोरे हाती लागत नव्हते.
(प्रतिनिधी)
असा झाला उलगडा...
पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित, गजेंद्र पालवे हे दोघे पूर्णवेळ या गुन्ह्णाच्या तपासावर काम करीत होते. त्यांना खबऱ्याकडून कणेरी मठावरील चोरी लखन माने याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कळंबा व बिंदू चौक कारागृहांतून जामिनावर बाहेर पडलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील चोरटा लखन माने हा बिंदू चौक कारागृहातून २७ फेब्रुवारी रोजी बाहेर पडल्याचे निष्पन्न झाले. तो याच परिसरातील राहणारा असल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्या हालचालींवर त्यांनी पाळत ठेवली. त्याचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता मित्र दीपक कांबळे याच्या मोबाईलवर फोन झाल्याचे दिसून आले. त्याच्याकडेही पोलिसांनी कसून चौकशी केली, यावेळी त्याने लखन माने हा गेले चार दिवस दारू पिऊन असतो. त्याच्याजवळ पैसेही भरपूर आहेत, अशी माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री पंचतारांकित एम. आय. डी. सी., गोकुळ शिरगाव येथे एका दारूच्या दुकानातून बाहेर पडताना माने याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या मोटरसायकलबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेतली असता जवळ ८० हजार रुपये मिळून आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कणेरी मठावर चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या या कटामध्ये आतापर्यंतच्या तपासामध्ये तो एकटाच असल्याचे निष्पन्न झाले आहे; परंतु यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
अशी केली चोरी...
४लखन माने हा कारागृहातून २७ फेब्रुवारीला जामिनावर बाहेर पडला. तेथून तो भवानी मंडप परिसरात आला. येथून मोटारसायकलीची चोरी करून तो कणेरी मठावर आला. या ठिकाणी त्याने एका महिलेचा व मित्राचा मोबाईल चोरला. त्यानंतर हे दोन्हीही मोबाईल विकून त्याने दारू पिऊन जेवण केले. दुसऱ्या दिवशी (दि. २८) दिवसभर तो मठावरच बसून होता.
४यापूर्वी तो वरचेवर मठावर येत असल्याने त्याला स्वामींच्या जुन्या निवासस्थानांची माहिती होती. त्याच मध्यरात्री मठावर कोणी नसल्याचे पाहून त्याने जुन्या निवासस्थानाच्या दरवाजांचा कडी-कोयंडा उचकटून तिजोरी फोडली. त्यातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने (नाणी) पोत्यात भरून तो गावी आला. त्याच्या घराशेजारी नव्या घराचे बांधकाम सुरू आहे.
४तेथील भिंतीशेजारी खुदाई करून पोते लपवून ठेवले. त्यापूर्वी त्याने खर्चासाठी ९० हजार रुपये काढून जवळ ठेवले. गेल्या तीन-चार वर्षांपासून तो चोरी करण्यामध्ये सराईत आहे. त्याच्या आतापर्यंतच्या चोरीमध्ये ही सर्वांत मोठी चोरी होती. लाखो रुपये मिळाल्याने तो भारावून गेला होता.
४मोटारसायकलवरून तो परिसरात फिरून दिवस-रात्र दारू, मटणावर ताव मारीत असे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तो मोटारसायकलवरून फेरफटका मारीत पैसे खर्च करू लागल्याने त्याची परिसरात चर्चा होऊ लागली आणि अलगदपणे तो पोलिसांच्या ताब्यात आला.