रुम एकच, दिली दोघा ग्राहकांना; हिऱ्याच्या बांगड्यांची झाली चोरी, बेळगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:23 PM2022-03-18T12:23:15+5:302022-03-18T12:26:56+5:30
हॉटेलमधून एक ग्राहक आपल्या रूमला लॉक करुन बाहेर पडला. दरम्यान दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम दुसऱ्या ग्राहकाला दिली. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? हा प्रश्न.
चंदगड : हाँटेल व्यवस्थापनाच्या भोगळ कारभारामुळे रुममधून एका ग्राहकाच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. व्यवस्थापकाने एकच रुम दोघा ग्राहकांना दिल्याने मोठा गोंधळ उडाला. याप्रकरणी हाँटेल व्यवस्थापकासह एका जोडप्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बेळगावमधील काकती येथे ही घटना घडली.
ओलम अँग्रो इंडिया प्रा. लि. गुरगाव (हरियाणा) या कंपनीच्या राजगोळी (ता. चंदगड) येथील साखर कारखान्याच्या एच.आर विभागप्रमुख क्षिप्रा बिजावत या कामानिमित्त बेळगावजवळील काकती येथील हाँटेल मेरिएटमध्ये वास्तव्यास होत्या. यावेळी रुममधून त्यांच्या हिऱ्याच्या बांगड्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१५) उशिरा घडली. याप्रकरणी बुधवारी (दि.१६) काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
क्षिप्रा बिजावत या कामानिमित्त बेळगावजवळील काकती येथील हाँटेल मेरिएटमध्ये वास्तव्यास होत्या. हाँटेलमधील २१९ क्रमांकाच्या रुममध्ये साहित्य ठेवून मंगळवारी सकाळी त्या राजगोळी खुर्द येथील साखर कारखान्याकडे गेल्या होत्या. रात्री त्या परतल्या त्यावेळी खोलीतील हिऱ्याच्या दोन बांगड्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी हाँटेल व्यवस्थापनाला कळविले. सुरुवातीला कोणीच याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी काकती पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रुमची झडती घेतली. पण क्षिप्रा ज्या रूम वास्तव्यास होत्या ती रुम कर्मचाऱ्यांनी तीन तासासाठी दुसऱ्या जोडप्याला दिल्याचे समोर आले.
चोरी नेमकी केली कुणी?
क्षिप्रा यांनी हॉटेलमधून बाहेर पडताना आपल्या रूमला लॉक लावले होते. दुपारी येथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या जोडप्याला शेजारची रूम देण्याऐवजी तीच रूम त्या दुसऱ्या ग्राहकाला दिली. तीन तास हे जोडपे हॉटेलमध्ये होते. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. पुढील तपास करीत आहेत.