Kolhapur: आत्या कामावर गेली, अल्पवयीन भाचीकडून घरात दागिन्यांची चोरी; मैत्रिणीसह दोघी जेरबंद
By उद्धव गोडसे | Published: March 26, 2024 04:22 PM2024-03-26T16:22:58+5:302024-03-26T16:25:23+5:30
चैनीसाठी चोरी, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर : कामावर गेलेल्या आत्याचे बंद घर फोडून कपाटातील सव्वादोन तोळे सोने आणि २० हजार रुपयांची रोकड लंपास करणा-या अल्पवयीन भाचीसह तिच्या मैत्रिणीला करवीर पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) अटक केले.
चैनीसाठी चोरी करणा-या दोन्ही संशयितांकडून पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. चोरीचा प्रकार गुरुवारी (दि. २४) सोनतळी येथे घडला होता. अटकेतील स्वाती सुदर्शन कांबळे (वय १९, रा. सोनतळी, ता. करवीर) हिची पोलिस कोठडीत रवानगी झाली, तर अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले.
फिर्यादी रुक्साना शाहरुख झाडी (वय ३५) यांचे सोनतळी येथे घर आहे. त्या कोल्हापूर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. गुरुवारी सायंकाळी त्या घर बंद करून कामासाठी गेल्या. दुस-या दिवशी सकाळी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घराच्या कडी-कोयंड्यावरील बोटाचे ठसे आणि संशयावरून पोलिसांनी फिर्यादी झाडी यांच्या भाचीला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत तिने मैत्रिणीला सोबत घेऊन चैनीसाठी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोघींकडून चोरीतील सव्वादोन तोळे सोन्याच्या दोन चेन, २० हजार रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त केल्याची माहिती करवीरचे उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दिली. निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, जालिंदर जाधव, अंमलदार सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, रणजीत पाटील, प्रकाश कांबळे, आदींच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.