शिंदे कॉलनीत ग्रामसेवकाच्या घरी ६२ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:30 AM2021-09-15T04:30:08+5:302021-09-15T04:30:08+5:30
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनीशेजारील शिंदे कॉलनीत अज्ञात चोरट्याने ६२ हजार ८८० रुपयांची घरफोडी केली. घरफोडीत सोन्या-चांदीच्या ...
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवरील जिल्हा परिषद कॉलनीशेजारील शिंदे कॉलनीत अज्ञात चोरट्याने ६२ हजार ८८० रुपयांची घरफोडी केली. घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. याबाबत ग्रामसेवक अमोल प्रकाश काजवे (वय ३८ रा. शिंदे कॉलनी) यांनी चोरीची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल काजवे हे करवीर पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक आहेत. गणेशोत्सवामध्ये काजवे हे दि. १० ते १४ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील ५ ग्रॅमची सोन्याची चेन, १ ग्रॅमचे सोन्याच्या तीन बाळ अंगठ्या, दीड ग्रॅमचे कानातील रिंग, ३० ग्रॅम चांदीचे निरंजन व वाटी, तसेच १५ हजारांची रोकड, असा ६२ हजार ८८० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंद झाली आहे.