शित्तूर-वारुण येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:17 AM2021-06-28T04:17:49+5:302021-06-28T04:17:49+5:30
शित्तूर-वारुण (दि.२७) ...
शित्तूर-वारुण (दि.२७) शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर-वारुण परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या समोरील कट्ट्यावर वीज वितरणने ठेवलेल्या ट्रान्सफाॅर्मरमधील एक लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना शित्तूर-वारुणमध्ये मुख्य चौकातच घडली आहे. वीज वितरण कंपनीने याची तक्रार शाहूवाडी पोलिसांत दाखल केली आहे.
शित्तूर-वारुणपैकी तळीचा धनगरवाडा येथे हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता. तो जळल्याने दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर आणून तो ठेवण्यात आला होता. मात्र चोरट्यांनी चार दिवसांपूर्वी त्याची जागा हलवून त्यामधील एक लाख रुपयांचे साहित्य लंपास केले व रिकामा बॉक्स तेथेच ठेवून चोरटे पसार झाले. ही चोरी रात्रीच्या वेळेस घडली असल्यामुळे त्याची कोणालाही कुणकुण लागली नाही. ही चोरी सराईत चोरट्यांनी केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गावचे वायरमन प्रकाश घाडगे यांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली. त्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वीच गावचे माजी सरपंच तानाजी भोसले यांचे ढवळेवाडी येथील लांड्याच्या ओढ्यावर बसवलेले इंजिन चोरीला गेले होते. त्याच्याआधी क्रांतिनगर येथे बसविण्यात आलेले सौर दिवे व त्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या.
फोटो :
शित्तूर-वारुण येथील ग्रामपंचायतीसमोरच चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील सगळे साहित्य चोरून बॉक्स असा रिकामा करून ठेवला आहे.