...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:28 PM2019-08-19T14:28:41+5:302019-08-19T14:35:51+5:30
कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.
उमाकांत राणिंगा यांचे शाहुपुरीतील कुंभार गल्लीत घर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे दुकान गेले पाच दिवस सात फूट पाण्यात होते. वैयक्तिक ग्रंथालयात त्यांनी पाच हजाराहून अधिक ग्रंथसंपदा जतन करुन ठेवली होती.
यापैकी विश्वकोष, ज्ञानकोष, चरित्रकोष, स्मृतिकोष, चित्राव शास्त्रींचे प्राचीन ग्रंथ, मध्ययुगीन चरित्रग्रंथ, समरांगण सूत्रधार आदि सुमारे अडीच हजार दुर्मिळ ग्रंथसंपदा पूराच्या पाण्यात भिजल्याने त्याचा लगदा झाला आहे. यातील दोन हजार पुस्तके वाचण्यायोग्य असली तरी त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.
याशिवाय गणेशोत्सवासाठी खरेदी केलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे चार लाखांचे नुकसान झाले आहे, ते वेगळेच. यासोबत घरातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, डिजिटल कॅमेरा, हार्डडिस्क आणि सर्व कागदपत्रे खराब झाली आहेत.
मूळचे चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील डॉ. गोपाळ गावडे कोल्हापूरातील महावीर महाविद्यालयात बीएड विभागात प्राध्यापक आहेत. पंचगंगा नदीकाठाजवळील शुक्रवार पेठेत शंकराचार्य मठाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरात आठ फूट पाणी शिरले. विद्यार्थी असल्यापासून जमा केलेली ३000 हून अधिक पुस्तके त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होती.
१९८९, २00५ सालच्या दोन्ही महापूराचा अनुभव घेतल्याने गावडे यांनी पाणी वाढू लागले तसे ही पुस्तके पाच फुटाच्यावर तीन रॅकमध्ये ठेवली. मात्र या महापूराने ती गिळंकृत केली. नेसत्या वस्त्रानीशी सहकाऱ्यांच्या घरात स्थलांतरीत झालेल्या गावडे यांनी न राहवून मंगळवारी भर पावसात पोहत घर गाठले आणि पुस्तके आणखी उंचावर ठेवली, परंतु पाणी जास्त वाढल्याने सांसारिक साहित्यासह पुस्तकांचेही नुकसान झाले.
सर्व्हिस रेकार्ड धोक्यात
या महापूरात गावडे सरांचे सर्व शासकीय रेकॉर्डही नष्ट झाले आहे. पंचनाम्यात फर्निचर, टीव्ही, फ्रीजसह त्यांची २९ वर्षाच्या नोकरीच्या आॅर्डर्स, प्रोफेसर पदाचा प्रस्ताव, प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, रेशन, आधार, पॅन, मतदान ओळखपत्रे, एटीएम व गॅसचे कार्ड, मुलांची आणि त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्लॉट आणि फ्लॅटची कागदपत्रे, एलआयसीच्या पॉलिसींचा लगदा झाला आहे.
टीव्ही, फ्रीज, फर्निचर या वस्तू पुन्हा मिळविता येतीलही; परंतु ४0 वर्षांत जमा केलेल्या आवडीच्या आणि गरजेच्या पुस्तकांची हानी कशी भरून निघणार? कितीही पैसे भरले तरी कुठून कुठून जमा केलेल्या या पुस्तकांचा सत्यानाश झाला आहे.
-डॉ. गोपाळ गावडे,
प्राध्यापक, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर.