...तर शेट्टी, सदाभाऊंच्या घरांवर मोर्चा

By admin | Published: August 19, 2016 11:59 PM2016-08-19T23:59:24+5:302016-08-20T00:11:10+5:30

शेतकरी संघटना : ४५ रुपयांसाठी साखर सहसंचालकांना निवेदन

... Then Front of Shetty, Sadbhau's house | ...तर शेट्टी, सदाभाऊंच्या घरांवर मोर्चा

...तर शेट्टी, सदाभाऊंच्या घरांवर मोर्चा

Next

कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांचे नेते’ म्हणणाऱ्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, हंगाम संपून सहा महिने उलटले तरी ४५ रुपयांवर तोंड उघडण्यास हे नेते तयार नाहीत. दहा दिवसांत हे पैसे मिळाले नाही तर साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकूच, पण खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरांवर मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील व युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक पाटील यांनी दिला.
गत गळीत हंगामातील एफआरपीमधील ४५ रुपये द्यावे, साखरेचे दर वाढल्याने आणखी पाचशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या मारला. यावेळी सहसंचालक सचिन रावल यांच्या टेबलावर शेतकऱ्यांनी साखर ओतून विविध मागण्या केल्या.
यावेळी पी. जी. पाटील व अ‍ॅड. शिंदे म्हणाले, कायद्याने चौदा दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी तडजोड करून शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास लावला. त्यामुळे आज ४५ रुपयांसाठी तिष्टत बसावे लागले आहे. सध्या साखरेचे दर ३८ रुपयांपर्यंत असल्याने कारखानदार मालामाल झाले असून, एफआरपी सोडून आणखी पाचशे रुपये दिले पाहिजे, तर ८.५ टक्के उतारा गृहीत धरून ‘एफआरपी’चे सूत्र तयार झाले पाहिजे.
सत्तेमुळे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची तोंडे बंद झाली आहेत. त्यांनी तडजोड केल्यामुळे आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली असून, पैशांसाठी शेतकरी तळमळत असताना दोन्ही नेते सरकारच्या पातळीवर तोंडही उघडत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या घरांवरच मोर्चा काढणार असल्याचे अ‍ॅड. शिंदे यांनी सांगितले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, प्रशांत पाटील, बदाम शेलार, प्रकाश चंदूरे, गुणाजी शेलार, हणमंतराव पाटील, विष्णू सणगर, आदी उपस्थित होते.


‘एफआरपी’मधील ४५ रुपये अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या मारला. सहसंचालक सचिन रावल यांच्या टेबलावर साखर ओतून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी अ‍ॅड. माणिक शिंदे, पी. जी. पाटील, आदम मुजावर, आदी उपस्थित होते.

Web Title: ... Then Front of Shetty, Sadbhau's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.