...तर महा-ई-सेवा केंद्र करणार सील
By admin | Published: August 25, 2016 12:12 AM2016-08-25T00:12:52+5:302016-08-25T00:50:50+5:30
प्रदूषणावर उपाय मूर्ती परत घेण्याचा!
इचलकरंजी : महा-ई-सेवा केंद्रातून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत बुधवारी पुरवठा कार्यालयात ई-सेवा केंद्र चालकांची बैठक पार पडली. यावेळी पुरवठा निरीक्षक महादेव शिंदे यांनी, शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसारच आकारणी करावी. पुन्हा तक्रार आल्यास संबंधित केंद्र सील करू, असा इशारा त्यांनी दिला.
सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्जांची विक्री नगरपालिकेतून केली जात आहे. या योजनेसाठी प्रतिज्ञापत्र, विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. त्यासाठी नागरिकांची शहरातील ई-सेवा केंद्रात गर्दी होऊ लागली आहे. याचा गैरफायदा घेत काही केंद्रचालकांनी मनमानी करीत शासनाने ठरवून दिलेल्या फीपेक्षा दुप्पट-चौपट पैसे आकारणी करून नागरिकांना लुटत आहेत.
रेशनकार्ड संदर्भातील कामांसाठी शहरातील तीन महा-ई-सेवा केंद्रांना पुरवठा कार्यालयाने परवानगी दिलेली आहे. मात्र, इतर ठिकाणच्या नागरिकांना येण्या-जाण्याचा त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने सर्वच महा-ई-सेवा केंद्रांत रेशनकार्डाची कामे द्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)
कानउघाडणी : बैठकीत केंद्रचालक धारेवर
शहरातील ई-सेवा केंद्रासंदर्भात अनेक नागरिकांसह विविध राजकीय पक्षांनी पुरवठा कार्यालयाकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पुरवठा निरीक्षक शिंदे यांनी शहरातील सर्वच महा-ई-सेवा केंद्रचालकांची बुधवारी बैठक घेतली. त्यात केंद्रचालकांची चांगलीच कानउघाडणी केली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. नागरिकांनीही केंद्रचालकांकडून लूट होत असल्यास त्याची रीतसर तक्रार द्यावी. ज्याच्या विरोधात तक्रार दाखल होईल, ते केंद्र सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.