...तर खासगी डॉक्टरांवर मेस्मा कायदा लावणार, हसन मुश्रीफ यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:53 PM2020-08-14T18:53:23+5:302020-08-14T18:54:49+5:30
कोरोनाचा कहर वाढत असून, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आता पुढे येण्याची गरज आहे. जर हे डॉक्टर सरकारी कोविड सेंटरमधून सेवा देणारच नसतील, तर त्यांच्यावर नाइलाजास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिला.
कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढत असून, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आता पुढे येण्याची गरज आहे. जर हे डॉक्टर सरकारी कोविड सेंटरमधून सेवा देणारच नसतील, तर त्यांच्यावर नाइलाजास्तव मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिला.
कोरोना रुग्णांवर उपचार होत नसल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत येत आहेत. अत्यवस्थ रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याच्यावर उपचार सुरू झाले पाहिजेत; नंतर बेड व त्याचा दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कमिटी तयार करावी. खासगी रुग्णालयांत बेड मिळत नाहीत. यासाठी कागल, आदमापूर बाळूमामा ट्रस्ट हॉस्पिटल, महासैैनिक दरबार हॉल, घोडावत विद्यापीठ येथे सरकारच्या वतीने मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र येथे फिजिशियन व एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता आहे.
एमबीबीएस गुणवत्ताधारक डॉक्टरांना शासन महिन्याला साठ हजार; तर एम.डी. डॉक्टरांना दोन लाख रुपये दिले जातात; तरीही ही मंडळी यायला तयार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
नागरिकांनीही मास्क वापरलाच पाहिजे. लक्षणे दिसताच संबंधिताने कुटुंबापासून वेगळे राहिलेच पाहिजे. त्यानंतर संबंधितांनी तातडीने स्राव देऊन तपासणी करून घेतली पाहिजे. खासगी डॉक्टरांनी लक्षणे दिसताच अहवालाची वाट न पाहता कोरोनाचे उपचार सुरू करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.