...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

By admin | Published: September 18, 2014 12:32 AM2014-09-18T00:32:59+5:302014-09-18T00:36:38+5:30

राजू शेट्टी यांचा पलटवार : राजकारणाचा धंदा करणाऱ्यांनी बोलू नये

... then 'r. Where was R.? | ...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

Next

कोल्हापूर : शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणामुळे दूध अतिरिक्त होऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतावे लागले, त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समाजकारण व राजकारण हे शेतकऱ्यांसाठी केले; पण ज्यांनी राजकारणाचा धंदा केला, त्यांनी आमच्यावर बोलू नये, अशी टीकाही शेट्टी यांनी पाटील यांच्यावर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील प्रचार प्रारंभ सभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खासदार शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला त्याच शब्दांत शेट्टी यांनी आज, बुधवारी उत्तर दिले. ‘युपीए’च्या काळात कांद्यावर निर्यातबंदी घातली नाही, असे म्हणणाऱ्या पवार यांचे साथीदार सप्टेंबर २०११ मध्ये पंतप्रधानांकडे कशासाठी गेले होते? आता शेतकऱ्यांच्या बाजूने गळा काढणाऱ्यांच्या हातात दहा वर्षे कृषी खाते असताना काय दिवे लावलेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत जमले नाहीत ते निर्णय नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांत घेतल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिल्याची वल्गना पवार करीत आहेत; पण हा दर कोणामुळे मिळाला हे शेतकऱ्यांना ज्ञात आहे. गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साठ्याचा चुकीचा अंदाज वर्तवून ती साखर बंदरात ठेवून कारखान्यांकडून कोणत्या दराने घेतली व ग्राहकांना कोणत्या दराने दिली, याचा खुलासा पहिल्यांदा शरद पवार यांनी करावा, असे आव्हानही खासदार शेट्टी यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्यामागे कोणाचा हात आहे? ‘वेफको’सह इतर कंपन्यांच्या कांदा खरेदी-विक्रीची माहिती उघडकीस येईल, त्यावेळी यातील खरे अर्थशास्त्र शेतकऱ्यांसमोर येईल. नाशिक येथील बाजार समित्यांवर कोणाचे वर्चस्व आहे? ‘नाफेड’ व ‘वेफको’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते? चांगदेवराव होळकर हे कोणत्या पक्षाचे आहेत? ‘नाफेड’चे अध्यक्ष असताना त्यांनी ‘वेफको’मध्ये कसा पैसा गुंतवला? याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी केलेली नाही, किमान निर्यातमूल्य आकारले होते. त्याविरोधात थेट सरकारला इशारा देऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पुतळे आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले, हे आर. आर. पाटील यांना दिसत नाही का? शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुग्धजन्य पदार्थांवर निर्यातबंदी घातल्याने संकलन बंद करण्याची वेळ दूध संघावर आली. कच्च्या साखरेच्या आयात-निर्यातीत घोटाळा झाला त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)

...तर शेतकरीही सुखाने दिवाळी खातील
पाच वर्षांत शेतकरी संघटनेने दिवाळी सुखाने खाऊ दिली नसल्याचे
आर. आर. पाटील सांगत आहेत; पण चुकीच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला कदापि सुखाने झोपू देणार नाही. प्रश्न तसेच भिजत ठेवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने ओरड करायची हे तुणतुणे बंद करा. साखर बोर्ड स्थापन केले; पण त्याचे कामकाज बंद आहे. आता कारखाने सुरू होतील. मग आम्ही गप्प बसायचे का? अशी विचारणा शेट्टी यांनी केली.
 

Web Title: ... then 'r. Where was R.?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.