...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:02 PM2017-11-17T18:02:58+5:302017-11-17T18:07:49+5:30

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

... then tender for sale of 'Daulat': Musharraf, employee union collapse with objections | ...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला

...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला

Next
ठळक मुद्देजिल्हा बॅँक बुडणार नाहीसोमवारी ढोलताशांसह वसुली

कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे पैसे मिळाले नसल्याने यंदाच्या हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नेत्यांचा करार रद्दची मागणी होत असली तरी कायद्याने तो आता मोडता येणार नाही. जर ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने मार्च २०१८ मध्ये करारातील अटीनुसार दहा कोटींचा हप्ता भरला नाही तर करार तोडला जाईल. त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने थकविलेली ऊसबिले आणि जिल्हा बॅँकेने कंपनीशी केलेल्या कराराबाबत चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेवर मोर्चा काढला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, मागील हंगामातील उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यंदा ‘न्यूट्रियंट्स’ला ऊस मिळणे अवघड आहे. त्यासाठी त्यांना काटा पेमेंट करूनच ऊस खरेदी करावा लागणार आहे.

‘पंचगंगा’, ‘गायकवाड’ हे कारखानेही भाडेतत्त्वावर दिले, त्याप्रमाणेच चंदगडच्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखून ‘दौलत’ भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. ‘न्यूट्रियंट्स’ पैसे थकविणार हे आम्हाला कसे माहीत? करार रद्द करण्याची मागणी केली असली तरी कराराचे उल्लंघन झाले तरच हा निर्णय होईल.

‘न्यूट्रियंट्स’ने आतापर्यंत बॅँकेचे पैसे भागविले आहेत. मार्च २०१८ पर्यंत दहा कोटींचा हप्ता द्यायचा आहे. तो थकला तर त्यांच्याशी केलेला करार रद्द होईल; पण त्यानंतर मात्र थेट विक्रीची निविदा काढावी लागेल, असेही अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.


बॅँकेच्या कर्मचारी युनियनशी झालेल्या कराराबाबत बोलताना अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, ९ नोव्हेंबर २००९ रोजी बॅँकेवर प्रशासक आले; पण १३ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. करार झाला; पण त्याच्या अंमलबजावणीत गडबड झाली आहे. ९ ते १३ नोव्हेंबर या काळात विषयपत्रिका व प्रोसीडिंगमध्ये बऱ्याच भानगडी झाल्या आहेत. बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी हे केले असून, केवळ बॅँकेच्या हितासाठी गप्प बसलो आहे.

बॅँक संचित तोट्यात असताना कर्मचारी आपले फरकाचे पैसे मागत असतील तर काय निर्णय घ्यायचा? तरीही युनियनशी आमचा सुसंवाद होता; पण ‘नाबार्ड’च्या तपासणीवेळी त्या अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्यांनी बॅँकेची बदनामी केल्याने त्या दिवसापासून सुसंवाद संपल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा बॅँक बुडणार नाही

जिल्हा बॅँक बुडणार असे आम्ही कधीच म्हणालो नाही. केवळ अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा, अशी आमची भावना होती. जिल्हा बॅँकेची स्थापना अमावस्येदिवशी झाल्याने ती कधीच बुडणार नसल्याचे स्पष्टीकरणही मुश्रीफ यांनी दिले.

सोमवारी ढोलताशांसह वसुली

छोटे थकबाकीदार राहिले आहेत. त्यांच्या वसुलीसाठी सोमवारी (दि. २०) ढोलताशांसह वसुली मोहीम राबविली जाणार आहे. राधानगरी स्टार्चकडे ३३ कोटी ७० लाख, तर ‘भोगावती कुक्कुटपालन’कडे ५ कोटी ८४ लाखांची थकबाकी आहे. यासाठी अनुक्रमे बी. के. डोंगळे व वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या घरांवर ढोलताशे घेऊन जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

 

Web Title: ... then tender for sale of 'Daulat': Musharraf, employee union collapse with objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.