...तर दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुण सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:25+5:302021-04-22T04:25:25+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी हे शाळांतील ...

... then tenth graders will get a chance to improve their marks | ...तर दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुण सुधारण्याची संधी

...तर दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुण सुधारण्याची संधी

Next

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी हे शाळांतील अंतर्गत मूल्यमापनावर उत्तीर्ण होणार आहेत. या पद्धतीने मिळालेल्या गुणांबाबत ते समाधानी नसतील, तर त्यांना गुण सुधारण्याची संधी शासन देणार आहे. बारावीच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

आंतरराष्ट्रीय, केंद्रीय मंडळांनी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या गुणांमध्ये समानता राहावी यासाठी राज्य शासनानेदेखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. ही परीक्षा देण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये झालेल्या अंतर्गत गुणांवर मूल्यमापन करून अंतिम गुण आणि श्रेणी दिली जाणार आहे. त्याबाबत समाधानी विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी शिक्षण विभाग संधी देणार आहे. त्याबाबतची माहिती लवकरच या विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे नियोजन असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. परीक्षा पुढे गेल्याचा मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे या परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकर जाहीर व्हावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे.

विद्यार्थी, पालक काय म्हणतात?

दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतिम मूल्यमापन करताना पूर्वपरीक्षेबरोबरच नववीतील गुणांचाही विचार करावा.

-पूनम मोहिते, पालक, कसबा बावडा.

परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर व्हावे.

-सीमा पोवार, पालक, वळीवडे.

बारावीची परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्याचे नवे वेळापत्रक लवकर जाहीर केल्यास आम्हा विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही.

-दर्शन खोत, विद्यार्थी, कोल्हापूर.

शिक्षक संघटनेला काय वाटते?

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण, अभ्यासावरही परिणाम झाला होता.

-राजेश वरक, उपाध्यक्ष, पुणे शिक्षक लोकशाही आघाडी.

दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय दुर्दैवी आहे. त्या रद्द करण्याऐवजी उशिरा घ्यायला हव्या होत्या. बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यांच्याबाबत कोरोनाची भीती नाही का?

-खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.

चौकट

मूल्यमापनात अडचण

काही शाळांमध्ये दहावीच्या पूर्वपरीक्षा झाल्या आहेत, तर काही शाळांमधील या परीक्षांना विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आलेले नाही. त्याचे मूल्यमापन करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी

दहावीचे विद्यार्थी : ५६७४५

बारावीचे विद्यार्थी : ५१७४९

Web Title: ... then tenth graders will get a chance to improve their marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.