..तर २१ जूनला नाशिकमध्ये विजयोत्सव : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:28+5:302021-06-17T04:16:28+5:30
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिल्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत ...
कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिल्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत. कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये २१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली .या आंदोलनात संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात याचीच उत्सुकता जास्त होती; पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.
चौकट
महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण
कोल्हापुरातून मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग फुंकताना आंबेडकर व संभाजीराजे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमदार, खासदार, मंत्री सहभागी झाले होते. आंदोलन मराठ्यांचे असले तरी त्याला उपस्थितांची मांदियाळी पाहिल्यावर महाविकास आघाडीच्या रथाला निळे, भगवे तोरण लावण्याची मुहूर्तमेढच रोवली गेल्याचे दिसत होते.
चौकट
चौकट
लाँगमार्च काढायला लागू नये
या चर्चेतून काही साध्य झाले नाही तर आम्ही यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुणे ते मुंबई असा लाँगमार्च काढला जाईल. हा लाँगमार्च आम्हाला काढायला लागू नये याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
चौकट
हे लोकप्रतिनिधी बोलले
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील या लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या मूक आंदोलनात आपली भूमिका मांडून ठामपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला.
चौकट
विमानाला हवामानाचा अडथळा तरी मुश्रीफ पोहोचलेच
सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून सकाळी ८ वाजता कोल्हापूरकडे निघालेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खास विमानाला पाऊस आणि हवामानाचा अडथळा आला. वातावरण स्वच्छ झाल्याने साडेअकरा वाजता ते विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर अभिवादन करून मंत्री मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडली.