...तर आयुक्तांचा पाणीपुरवठा तोडू

By admin | Published: August 19, 2016 11:50 PM2016-08-19T23:50:16+5:302016-08-20T00:13:58+5:30

शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा : नियाज खान यांचा प्रशासनाला इशारा

... then the water supply to the commissioners can be broken | ...तर आयुक्तांचा पाणीपुरवठा तोडू

...तर आयुक्तांचा पाणीपुरवठा तोडू

Next

कोल्हापूर : शहरवासीयांना रोज मुबलक पाणीपुरवठा होण्याकरिता दोन दिवसांत उपाययोजना कराव्यात, अन्यथा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निवासस्थानाचा पाणीपुरवठा तोडण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते नियाज खान यांनी शुक्रवारी शिवसेनेने महानगरपालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी दिला. महानगरपालिकेने सुरू केलेली स्पॉट बिलिंग पद्धत तातडीने बंद करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कोल्हापूर शहरास होणारा एक दिवस आड पाणीपुरवठा बंद करून तो रोज करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेने शुक्रवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात पुरुषांसह महिलासुद्धा मोठ्या संख्येने घागरी, बादल्या घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरापासून मोर्चाला सुरुवात झाली. महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर मोर्चा अडविण्यात आला. मोर्चाच्यावतीने एका शिष्टमंडळाने महापौर अश्विनी रामाणे व आयुक्त पी. शिवशंकर यांची एकत्र भेट घेतली. शिष्टमंडळात शिवसेनेचे गटनेते नियाज खान, नगरसेवक अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांच्यासह मंगल साळोखे, पूजा भोर, रूपाली कवाळे, मेघना पेडणेकर, अनिल पाटील, विशाल देवकुळे, जयवंत हारूगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, महेश उत्तुरे आदींचा समावेश होता. महापौरांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यावेळी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख हेदेखील उपस्थित होते.
येत्या दोन दिवसांत जर शहराला पूर्ववत रोज पाणीपुरवठा केला नाही, तर शिवसैनिक आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निवासस्थानचा पाणीपुरवठा बंंद करतील, असा इशारा नियाज खान यांनी दिला. उपनगर अभियंता रावसाहेब चव्हाण हे पाणीपुरवठा विभागाच्या कामाला न्याय देत नाहीत. कधी फोन घेत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी केली. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शनिवारच्या महासभेत निर्णय घेऊन पूर्ववत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महापौर रामाणे यांनी दिले. (प्रतिनिधी)


पाणीपुरवठा सुरळीत सुरू
गेले तीन दिवस जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला शहरातील काही उपनगरे तसेच ई वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरू करण्यात आला. तरीही काही परिसरांत कमी दाबाने पाणी मिळाले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी टॅँकरद्वारे पाणी द्यावे लागले. आज, शनिवारपासून पुरेशा दाबाने पाणी दिले जाईल, असे महापलिकेचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले.
जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून शिंगणापूर उपसा केंद्रातून पाणी उचलण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कमी दाबाने पाणी उचलण्यात आले. दुपारनंतर ही गती वाढविण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाला. तथापि, पाणी कमी दाबाने मिळत होते. शनिवारपासून पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असा विश्वास महापालिका सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात २४ टॅँकरच्या माध्यमातून ९० फेऱ्या करून पाणी देण्यात आले.

Web Title: ... then the water supply to the commissioners can be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.