शिवाजी पार्कमधील १६ रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 02:06 PM2021-06-23T14:06:48+5:302021-06-23T14:09:15+5:30

Road Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. यातून तीन महिन्यांपूर्वी प्रमुख रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे; पण रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

There are 16 roads in Shivaji Park | शिवाजी पार्कमधील १६ रस्त्यांची लागली वाट

कोल्हापुरातील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे. (फोटो : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी पार्कमधील १६ रस्त्यांची लागली वाट महापालिकेचे दुर्लक्ष, रहिवाशांची गैरसोय

कोल्हापूर : येथील शिवाजी पार्कमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सर्वच रस्ते उकरल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सद्या पार्कमधील १६ रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. तेथील रस्त्यांची वाट लागल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. यातून तीन महिन्यांपूर्वी प्रमुख रहिवाशांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे; पण रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

विक्रम हायस्कूलपासून शिवाजी पार्कचा रहिवासी परिसर सुरू होतो. तेथे उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात; पण या परिसरातील रस्ते दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महिन्यापूर्वी पार्कमधील प्रमुख रस्ते गॅस आणि पिण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी उकरण्यात आले. त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याकडे लक्ष दिले नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मातीचे ढिगारे आहेत. पावसाचे पाणी रस्त्यातच तुंबते. हलक्या पावसातही चिखल होतो. या रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही तारेवरची कसरत करावी लागते. यातून अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

विक्रम हायस्कूल चौक ते नानासाहेब गद्रे बालोद्यानजवळून जाणारा ॲपेक्स नर्सिंग होमसमोरील रस्ता खेड्यांपेक्षा वाईट झाला आहे. कापसे बंगला ते भुर्के बंगलापर्यंतच्या रस्त्यावरून चालतही जाता येत नाही, अशी अवस्था त्याची झाली आहे. पार्कमधील सर्वच रस्ते खड्डेमय आहेत. पाऊस पडल्यानंतर दलदल आणि ऊन पडल्यानंतर धूळ असे चित्र तिथे असते.

आमदारांची भेट

शिवाजी पार्कमधील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी मंगळवारी विविध रस्त्यांची पाहणी केली. त्यांनी खराब रस्ताप्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पावसाळा होईपर्यंत किमान रस्त्यावरचे खड्डे तरी भरावे, अशा त्यांनी सूचना दिल्या.


शिवाजी पार्कमधील तब्बल १६ रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून चालतानाही अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागतो. रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन मार्च महिन्यात आयुक्तांकडे दिले होते. अजून काहीही कार्यवाही झालेली नाही.
ॲड. अभिजित कापसे, रहिवासी


शिवाजी पार्कमधील अनेक रस्त्यांवरून चालतही जाता येत नाही. पाऊस सुरू झाल्यानंतर चिखलाचे साम्राज्य असते. रोज किरकोळ अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक आणि रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.
ॲड. कल्याणी माणगावे,
सामाजिक कार्यकर्त्या


गॅस आणि पिण्याच्या पाईपलाईनसाठी शिवाजी पार्कमधील रस्ते उकरले आहेत. ते नव्याने करण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. निविदा प्रसिद्ध केली आहे. ठेकेदार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण पावसाळ्यानंतरच नवीन रस्त्याचे काम सुरू होईल. तोपर्यंत मुरूम टाकून खराब रस्ते दुरुस्त केले जातील.
-हर्षजित घाटगे,
उपशहर अभियंता, महापालिका

Web Title: There are 16 roads in Shivaji Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.