जिल्ह्यात ३३१४ टन खत उपलब्ध
By admin | Published: May 20, 2015 09:52 PM2015-05-20T21:52:37+5:302015-05-21T00:08:51+5:30
खरीप हंगाम : जिल्हा परिषद कृषी समिती सभेत माहिती
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत ३३१४ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, महाबीजचे १५२४.४० क्विंटल, खासगी कंपनीचे २१७७.०३ क्विंटल, असे मिळून एकूण ३७०१.४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात प्राप्त झाल्याची माहिती कृषी समिती बैठकीत दिली.बॅ. नाथ पै समिती सभागृहात मंगळवारी कृषी समितीची सभा सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य दिलीप रावराणे, विभावरी खोत, सोनाली घाडीगावकर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेमार्फत खरीप हंगाम २०१५ साठी संकरित सह्याद्री बियाण्याकरिता अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रति किलो १६० रुपये किंमत ७५ टक्के अर्थसाहाय्य रुपये १२० व लाभार्थी हिस्सा ४० रुपये राहील. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला १ ते ३ किलोंपर्यंत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचे ३०० हेक्टरचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले असून, यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेच्या अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर कृषी विभागाकडे याची चौकशी करता येईल.जिल्ह्यात बायोगॅस उभारणीचे शासनाचे उद्दिष्ट्य अद्याप प्राप्त झालेले नसून, जिल्हास्तरावर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६८५ व जाती, जमातीसाठी १५ असे एकूण ७०० बायोगॅस आस्थापित करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. याशिवाय दरवर्षी खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या जिल्हा पातळी भातपीक स्पर्धा व तालुका पातळी भातपीक स्पर्धा व रक्कम वाढविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही या सभेत ठराव घेण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदे सेस अंतर्गत दरवर्षी दोन सिंधू शेतिनिष्ठ पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्कारांसाठी असलेली बक्षिसांची रक्कम वाढवून जिल्हा परिषदेकडे शिफारस करण्याचाही निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये याची दक्षता संपूर्ण यंत्रणेने घेतलेली आहे. या सर्व विषयांबाबत पंचायत समिती स्तरावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही सभापती रणजित देसाई यांनी केले. (वार्ताहर)
उसासाठी प्रथमच अर्थसाहाय्य
भात उत्पादनाबरोबर ऊस उत्पादन वाढावे यासाठी ऊस बियाणे रोपाकरिता प्रथमच ५० टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, हेक्टरी रुपये आठ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. याकरिता लागवडीचे क्षेत्र मर्यादा ०.२१ ते १ हेक्टर एवढी राहील.
महाबीजचे १५२४.४० क्विंटल व खासगी कंपनीचे २१७७.०३ क्विंटल, असे एकूण ३६०१.४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात प्राप्त झाले असल्याचे सभापती रणजित देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या खासगी विक्रेते व खरेदी विक्री संघ यांच्याकडे उपलब्ध आहे.