जिल्ह्यातील ४०८ गावांमध्ये बालसंरक्षण समित्याच नाहीत
By admin | Published: April 22, 2015 10:43 PM2015-04-22T22:43:08+5:302015-04-23T00:41:06+5:30
आदेशाला केराची टोपली : कक्ष माहितीच्या प्रतीक्षेत
सांगली : बालकांवर होत असलेले अत्याचार रोखण्याकरिता प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समितीचे गठण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी केवळ २९५ गावातच या समितीचे गठण झाल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे आली आहे. उर्वरित ४०८ गावांमध्ये बालसंरक्षण समित्या गठित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार सर्वच ग्रामपंचायत व नगरपरिषदेत या समितीचे गठण होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हा किती उदासीन आहे, याचा प्रत्यय येत आहे. या समितीच्या गठणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या. प्रत्येक ग्रामपंचायतीला लेखी आदेशही त्यांनी काढले होते; परंतु त्यांच्या सूचनांनाही केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. शासनाच्यावतीने बालकांना संरक्षण मिळावे, बालमजुरी कमी व्हावी, याकरिता विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. शिवाय, तसे कायदेही तयार होत आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असलेल्या विभागांकडून त्याला बगल दिली जात असल्याने हे कायदे कुचकामी ठरत आहेत. कायदे करून बालकांच्या समस्या सुटणार नाहीत, हे लक्षात आल्यावर शासनाच्यावतीने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत बालकांचे संरक्षण व्हावे, याकरिता गाव बालसंरक्षण समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासनाच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समिती गठित करण्याच्या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. त्या सूचना प्रशासकीय यंत्रणेद्वारे ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या; मात्र त्या कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच गावात या समितीचे गठण झाले नसल्याचे समोर येत आहे. तासगाव, वाळवा तालुक्यात शंभर टक्के गावामध्ये, तर मिरज तालुक्यातील तीन, जत ६०, शिराळा ४५ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात २० गावांमध्ये बालसंरक्षण समिती गठीत आहेत. उर्वरित आटपाडी, मिरज, खानापूर, पलूस, कडेगाव या तालुक्यातील एकाही गावात बालसंरक्षण समिती गठित झाल्याचा अहवाल जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाला नाही. (प्रतिनिधी)
गावपातळीवर सरपंच समितीचे अध्यक्ष
गावपातळीवर बाल संरक्षण समितीचे अध्यक्षपद सरपंचांकडे, तर सचिवपद अंगणवाडी सेविकेकडे आहे. याशिवाय पोलीसपाटील, आशा सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तीन स्थानिक सामाजिक प्रतिनिधी, वय वर्षे १२ ते १८ वयोगटातील मुलगा आणि मुलगी आदी दहाजण सदस्य आहेत. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून बालविकास प्रकल्प अधिकारी सदस्य सचिव आहेत. गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील एक प्रतिनिधी आणि गावपातळीवरील समित्यांमधून दोन प्रतिनिधी, अशा बाराजणांचा समितीत समावेश आहे.