कोल्हापुरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; नवीन २८ रुग्ण : एकूण ३३१ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:34+5:302021-03-04T04:43:34+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी नवीन २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोल्हापूर शहर व ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी नवीन २८ कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोल्हापूर शहर व शहरास लागून असलेल्या करवीर तालुक्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन २८ रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकही मृत्यू झाला नाही.
गेल्या चोवीस तासांचा अहवाल सीपीआर रुग्णालयाने मंगळवारी सायंकाळी प्रसिध्द केला. ५१५ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १० जणांना कोरोनाची लागण झाली. १०७ व्यक्तींच्या ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. त्यापैकी दोघेजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, तर खासगी रुग्णालये व प्रयोगशाळेत झालेल्या २४५ चाचण्यांपैकी १६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३३१ आहे.
कोल्हापूर शहरात नवीन १५ कोरोना रुग्ण आढळून आले. नगरपालिका हद्दीत तीन, गडहिंग्लज, करवीर, हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी दोन, तर भुदरगड, कागल, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.