कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टर्स, नर्स, औषधे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:56+5:302021-06-02T04:19:56+5:30

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, औषधे नाहीत. वेळेत औषधे खरेदी का केली नाही, लसीकरण अपुरे झाले ...

There are no doctors, nurses, medicines for the treatment of coronary heart disease | कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टर्स, नर्स, औषधे नाहीत

कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टर्स, नर्स, औषधे नाहीत

Next

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, औषधे नाहीत. वेळेत औषधे खरेदी का केली नाही, लसीकरण अपुरे झाले आहे, अशा आरोग्यविषयक प्रश्नांचा भडिमार जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सतीश पाटील हे घरून तर सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने समिती सभागृहात उपस्थित होते. बहुतांशी अधिकारीही ऑनलाईन सहभागी झाले.

सभेच्या सुरूवातीलाच प्रसाद खोबरे यांनी कोरेाना सेंटरवर औषधे मिळत नसल्याची तक्रार केली. वेळेत औषधे खरेदी का झाली नसल्याची अरुण इंगवले यांनी तर लसीकरण कमी होत असल्याबाबत शिवाजी मोरे यांनी विचारणा केली. ऑनलाईन सभा घेण्याबाबत गोंधळ झाला. ‘गोकूळ’ निवडणुकीला १०० माणसे चालतात आणि सभेला का चालत नाही, असा प्रश्न राजवर्धन निंबाळकर यांनी उपस्थित केला.

उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या वाईट अवस्था आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाचा कणा आहे. परंतु अनुभव चांगले नाहीत. अनेक सदस्यांनी याच विषयावर प्रश्न विचारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, पंधराव्या वित्त आयोगातून डॉक्टर, नर्स, स्वच्छता या सगळ्यासाठी निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १०२५ गावांतील नियंत्रण जिल्हा पातळीवरून होवू शकत नाही. अधिकाधिक निधी उपलब्ध करून रुग्णांची सोय करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न सुरू आहेत. २४ तास वॉर रूम सुरू आहे. यावेळी झालेल्या चर्चेत कागलच्या सभापती पूनम महाडिक, विजया पाटील यांनी भाग घेतला. अध्यक्ष बजरंग पाटील यांनीही नाभिक बांधवांना द्यावयाच्या खुर्च्यांची नावे सदस्यांनी अजूनही दिली नाहीत. चार दिवस वाट पाहून अनुदान वितरित करणार असल्याचे स्पष्ट केले.

चौकट

साथरोग सर्वेक्षण कक्षाला संगणक देणार

दीड कोटी रुपयाचे संगणक आणि प्रिंटर जिल्हा परिषदेने घेतले. परंतु गेले वर्षभर सर्व आकडेवारीचे संकलन करणाऱ्या साथरोग सर्वेक्षण कक्षाचे जुन्याच संगणकावर काम चालले आहे या ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल यावेळी घेण्यात आली. या कक्षाला संगणक का दिले नाहीत, अशी विचारणा राजवर्धन निंबाळकर यांनी केली. यावर सीईओ चव्हाण यांनी त्यांनी मागणी करावी. तातडीने त्यांना संगणक देवू असे स्पष्ट केले.

चौकट

भुदरगडच्या सभापतींची फटकेबाजी

भुदरगडचे प्रभारी सभापती सुनील निंबाळकर यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी नाव घेवून महिला आणि बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी टीकेचे लक्ष्य केले. त्यांची मनमानी झाल्याचा आरोप करत ते काय महिला विभागाचे नेते आहेत काय, अशी विचारणा केली. भुदरगड येथील प्रशिक्षणाबाबत अतिरिक्त खर्च झाला असल्यास तो वसूल करण्याचा अहवाल देण्यात आला आहे. मात्र ४० लाखांचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे रसाळ यांनी सांगितले.

चौकट

औषध बिलांची छाननी सुरू

गेल्यावर्षीच्या औषध बिलांच्या ७७ फाईल्स या वित्त विभागाकडून छाननी होवून पुन्हा आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार छाननी करून संबंधितांची बिले अदा केली जातील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. संगणक खरेदीबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकट

पोलीस बंदोबस्त कशाला

जिल्हा परिषदेच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त का मागवला, आम्ही काय चोर आहे काय, अशी विचारणा विजय भोजे यांनी यावेळी केली. पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही आत न सोडण्यासाठी एक अधिकारी आणि सात पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यावरून भोजे यांनी संताप व्यक्त केला.

सदस्यांच्या मागण्या

विजय बोरगे /इचलकरंजीच्या अलायंन्स रुग्णालयाची चौकशी करा

विजय भोजे/पालकमंत्र्यांनी गेल्यावर्षी मंजूर केलेल्या शाळा दुरूस्तीचे पैसे अजूनही का लागले नाहीत?

अंबरीश घाटगे/ ग्रामीण भागातील एचआरसीटीच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची गरज

हेमंत कोलेकर/ कोविडच्या खर्चासाठी दिलेल्या पत्रांना मंजुरी द्या

वंदना हळदे/ घरकुलचे अनुदान तातडीने वर्ग करावे

जीवन पाटील/ पदाधिकाऱ्यांचा अवमान करणाऱ्या भुदरगडच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा

०१०६२०२१ कोल झेडपी ०१

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये डावीकडून स्वाती सासने, डॉ. पद्माराणी पाटील, हंबीरराव पाटील, संजयसिंह चव्हाण, प्रवीण यादव, मनीषा देसाई, डॉ. उषादेवी कुंभार समिती सभागृहातून सहभागी झाल्या होत्या.

०१०६२०२१ कोल झेडपी ०२

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना व्यतिरिक्त कोणालाही आत प्रवेश न देण्यासाठी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

छाया नसीर अत्तार

Web Title: There are no doctors, nurses, medicines for the treatment of coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.