ग्रामीण भागात शासकीय बालरोगतज्ज्ञच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:17+5:302021-05-30T04:20:17+5:30
कोरोनाची तिसरी लाट येणार असून, ती बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, असा मतप्रवाह असताना ग्रामीण भागामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञच नाहीत ...
कोरोनाची तिसरी लाट येणार असून, ती बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, असा मतप्रवाह असताना ग्रामीण भागामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञच नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेत बालकांना होणारा प्रादुर्भाव रोखणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तीन पातळ्यांवर आरोग्य यंत्रणा विभागली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित येथील सीपीआर हे जिल्हा रुग्णालय येते. या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ आणि प्राध्यापक म्हणून सहा जागा आहेत. या सहाही जागा भरल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अखत्यारित जिल्ह्यातील २१ रुग्णालये येतात. त्यामध्ये उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांमधील २३ मंजूर पदांपैकी १५ जागा भरल्या असून, आठ जागा रिक्त आहेत. याच रुग्णालयांवर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अवलंबून असल्याने या रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांवर उपचार करण्याची जबाबदारी या कमी संख्येने असणाऱ्या डॉक्टरांवरच पडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित ७६ प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. मात्र, या केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असले तरी स्वतंत्र बालरोग तज्ज्ञ नेमले जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात याबाबतच्या अडचणी वाढणार आहेत.
चौकट -
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ७६
बालरोगतज्ज्ञ ००
उपजिल्हा रुग्णालये २१
बालरोग तज्ज्ञ मंजूर पदे २३, भरली १५, रिक्त ८
जिल्हा रुग्णालय
बालरोगतज्ज्ञ मंजूर पदे ६, भरली पदे ६, रिक्त ०
ग्राफ
जिल्ह्यातील एकूण रुग्ण १ लाख ७ हजार ३७२
बरे झालेले रुग्ण ८९ हजार ०२७
१० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील रुग्ण ३ हजार ८४५
११ ते २० वर्षे वयोगटातील रुग्ण ७ हजार ७८५
चौकट -
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
बालरुग्णांवर उपचार करणारी खासगी रुग्णालये ही ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त आहेत. एक तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बालरोगतज्ज्ञ नाहीत आणि खासगी रुग्णालयेही मर्यादित त्यामुळे तिसऱ्या लाटेत जर लहान मुलांमध्ये संसर्ग वाढला, तर आरोग्य यंत्रणेला ते एक मोठे आव्हान राहणार आहे.
कोट
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ यांची पदे नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातूनच या सर्वांवर उपचार करण्यात येतात. तिसरी लाट आणि लहान मुलांवरील प्रादुर्भाव याचा विचार करून जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सूचनांनुसार नियोजन करण्यात येणार आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी