करवीरमध्ये आजही ६४८ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:10+5:302021-06-27T04:16:10+5:30
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यापासून धोकादायक स्वरूप धारण केले आहे. आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक उपाय ...
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यापासून धोकादायक स्वरूप धारण केले आहे. आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक उपाय योजनेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. इतर तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना करवीर तालुक्यातील रुग्णसंख्या तिप्पट-चौपट वाढत असल्याने करवीर तालुका अति हॉटस्पॉट बनत चालला आहे.
करवीरमधील अनेक गावे हॉटस्पॉट होऊ लागली असतानाही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीकडून कडक लॉकडाऊन अथवा समूह संसर्ग रोखण्याचे उपाय होत नाहीत अथवा जनतेकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे.
करवीर तालुक्यातील अति हॉटस्पॉट गावात घर टू घर अँटिजन टेस्टची सक्ती केली जात आहे. यासाठी प्रशासनाने दबाव आणल्याने ग्रामपंचायत पातळीवर या टेस्ट करण्यासाठी गती देण्यात येत आहे. आजच्या दिवशी ६४८ रुग्णसंख्या ही आजपर्यंत २४ तासांतील उच्चांकी आहे तर सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित व मृतांची लाट थांबवण्याचे दिव्य आरोग्य विभागासमोर आहे.