एक इंच पावसाच्या पाण्यावर जगविली दोन हजार झाडे

By admin | Published: May 21, 2016 12:05 AM2016-05-21T00:05:05+5:302016-05-21T00:11:30+5:30

हातकणंगलेत फुलवली आमराई : बाळासाहेब कारदगे यांचा ५० एकर शेतीतील उपक्रम; पर्जन्य जलसंचय -जलमित्र

There are two thousand trees in one inch rain water | एक इंच पावसाच्या पाण्यावर जगविली दोन हजार झाडे

एक इंच पावसाच्या पाण्यावर जगविली दोन हजार झाडे

Next

संतोष मिठारी--कोल्हापूर --पावसाच्या पूर्ण हंगामात कसाबसा एक ते सव्वा इंच पाऊस होणाऱ्या हातकणंगले तालुक्यात कोल्हापुरातील शेतकरी बाळासाहेब कारदगे यांनी ५० एकरांतील आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. यासाठी त्यांनी पर्जन्य जलसंचयाद्वारे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) स्वयंपूर्णता साधली आहे.
मौजे तासगाव-हेर्ले सीमेवर ५० एकर कोरडवाहू जमिनीवर गेल्या पाच वर्षांपूर्वी आंब्याची दोन हजार झाडे लावली. त्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी या परिसरात तीन कूपनलिका आणि विहीर खोदली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना पाणीटंचाई जाणवत होती. अशा स्थितीत झाडे जगविण्यासाठी त्यांच्या मुळावर ज्यूटच्या पोत्यांचे आवरण घालणे असे प्रयत्न त्यांनी केले. पण, पाण्यासाठी ठोस पर्याय असावा या उद्देशाने त्यांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेल्या कूपनलिका आणि कृषी विभागाने बांधलेला बंधारा या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पाण्याचे पुनर्भरण केले. त्याचा चांगला परिणाम झाला. गेल्या वर्षी कमी पाऊस होऊनदेखील कारदगे यांची विहीर, कूपनलिकांना सध्या पुरेसे पाणी असून त्याद्वारे त्यांनी आपली आंब्याची दोन हजार झाडे जगविली आहेत. कारदगे यांचा दुष्काळी भागातील पाण्याच्या स्वयंपूर्णतेचा उपक्रम अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
पुनर्भरण केले असे
कृषी खात्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’अंतर्गत जे बंधारे बांधले होते, त्यांचे कारदगे यांनी निरीक्षण केले. त्यांचा जलसंचयासाठी फारसा उपयोग होत नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यावर कारदगे यांनी त्यांच्या जमिनीच्या परिसरात असलेला एक बंधारा पूर्णपणे मोडून टाकला. शिवाय सिंचन विभागातील अभियंत्याच्या सल्ल्याने धरणाच्या भिंतीचा पाया खडकापर्यंत काढून त्यात पूर्ण काळी माती भरून त्यावर मुरुम व दगडाचे आवरण घातले. तसेच सांडवा तळापासून दहा फूट उंच केला. बाजूला ३५ इंचांची व ३५ फूट व्यासाची विहीर खोदली. या ठिकाणी किरकोळ पाऊस झाला तरी, त्याचे पाणी बंधाऱ्यात मुरून ते विहिरीत साठते. पर्जन्य जलसंचयाचा हा उपक्रम त्यांनी कूपनलिकेसाठी केला. त्यांनी कूपनलिकेच्या उताराच्या बाजूला लांबपर्यंत चर मारली. त्यात प्लास्टिकचा कागद घालून खडी भरली. त्याला आउटलेट करून ते कूपनलिकेच्या बाजूला जोडले. याआधी कूपनलिकेच्या बाजूला वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक चर खोदून त्यात खाली दगड, मोठी व बारीक खडी, त्याच्यावर वाळूचा थर आणि कूपनलिकेच्या केसिंग पाईपला दहा एमएमचे छिद्र मारून त्यावर काथ्या गुंडाळला.


शहरांमध्ये पाण्याचा अधिक प्रमाणात अपव्यय होत आहे. शिवाय ग्रामीण भागात पाटाद्वारे पाणी देण्याच्या पद्धतीत पाणी वाया जाते. हे टाळणे आवश्यक आहे. शेतीसाठी ठिंबक सिंचनचा वापर करण्यात यावा. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल. ‘पाणी अडवा - पाणी जिरवा,’ रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाणीवापराबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘जलमित्र अभियान’चा उपक्रम स्तुत्य आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर.

रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे अशा पद्धतीने कोणत्याही विहिरीचे पुनर्भरण करता येते. त्या विहिरीत जमिनीवरचे पाणी वळवून आणणे शक्य आहे. असा स्वरूपाचा प्रयोग मी पाच ते सहा ठिकाणी केला असून यात यश मिळाले आहे. ज्या कूपनलिकेला अजिबात पाणी नव्हते, ती चार तास चालत आहे. तसेच जी विहीर पावसाळ्यानंतर कोरडी पडत होती, त्यात जानेवारीअखेरपर्यंत पाणी उपलब्ध होत आहे.
- बाळासाहेब कारदगे, शेतकरी, कोल्हापूर.

Web Title: There are two thousand trees in one inch rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.