गतवैभव देण्याचे आव्हान कायम

By Admin | Published: August 4, 2015 11:55 PM2015-08-04T23:55:40+5:302015-08-04T23:55:40+5:30

गडहिंग्लज बाजार समिती : सत्ताधाऱ्यांवर ‘जबाबदारी’, विरोधकांनाही ‘बळ’

There is a challenge to deliver the past glory | गतवैभव देण्याचे आव्हान कायम

गतवैभव देण्याचे आव्हान कायम

googlenewsNext

राम मगदूम-गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधाऱ्यांवरच पुन्हा टाकलेला विश्वास आणि विरोधकांना दिलेली लक्षणीय मते दोन्ही ‘दखलपात्र’ आहेत. निकालावरून सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आणि विरोधकांचे ‘बळ’ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.आर्थिक अडचणीतील बाजार समितीवर निवडणूक खर्चाचा भुर्दंड नको आणि सर्वांच्या सहकार्यातून समितीचा ‘बाजार’ सावरावा या उद्देशानेच गतवेळीदेखील निवडणूक ‘बिनविरोध’चा प्रयत्न झाला. मात्र, ‘कागल’च्या तत्कालीन राजकारणाचा फटका ‘गडहिंग्लज’लाही बसल्याने निवडणूक झाली. सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी ‘लढून’ एकतर्फी सत्ता मिळविली. परंतु, त्यांच्याच ‘सभापती’नी नेत्यांचे स्वप्न अन् ‘गडहिंग्लज’ची प्रतिष्ठा धुळीला मिळविली.याच पार्श्वभूमीवर यावेळची निवडणूकदेखील गाजण्याची आणि वाजण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे ती नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी ‘गाजली’ आणि सभासदांनी त्यांना ‘वाजवले’ही. तथाकथित भूखंड घोटाळ्याभोवतीच या निवडणुकीचा प्रचार-अपप्रचार केंद्रित राहिला. मात्र, बेकायदा भूखंड वाटप रद्द केल्याचा मुद्दा ठासून सांगितल्यामुळेच
त्यातून सत्ताधाऱ्यांची ‘सुटका’
झाली.
चंदगडचे तिन्ही पाटील, ‘गडहिंग्लज’च्या संध्यादेवी कुपेकर, श्रीपतराव शिंदे व सदानंद हत्तरकी, आजऱ्याचे जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई व रवींद्र आपटेंसह ‘कागल’च्या मुश्रीफ-मंडलिक व विक्रमसिंहराजेंच्या गटाची मोट बांधण्यात प्रकाश चव्हाण आणि अशोक चराटींना यश आले. एकीची मोट व एकसंघ आघाडीमुळेच त्यांची सत्ता अबाधित राहिली.
विरोधी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मित्रपक्षांना व गटांना एकत्र आणून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. कृषी प्रक्रिया गटातील अपक्ष उमेदवार श्रीरंग चौगुले यांच्यासह विरोधी आघाडीला यशाचा पल्ला लांब राहिला, तरी त्यांनी घेतलेली मते लक्षणीय आणि विरोधी राजकारणाला बळ देणारी आहेत. किंबहुना, हाच या निवडणुकीच्या निकालाचा
बोध आहे.


हे करायले हवे
नवनिर्वाचित संचालक मंडळात भाजपचा प्रतिनिधी असल्यामुळे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सहकार्य व मदत मिळविणे सोपे झाले आहे. त्यांची साथ मिळाल्यास गतवैभव मिळवून देणे अवघड नाही.
सीमाभागातील नावाजलेली मार्केट कमिटी म्हणून गडहिंग्लजची ओळख होती. मात्र, शेतीमालाची आवक घटल्याने गडहिंग्लजच्या मार्केट यार्डाला अवकळा आली आहे. याठिकाणी कृषिपूरक व्यवसाय वाढण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतकरी भवनासह जनावरांच्या बाजारातही मूलभूत सुविधा द्यायला हव्यात.
गडहिंग्लज शहरातील भाजीपाल्याचा सौदा मार्केट यार्डात हलविण्याबरोबरच अधिकाधिक शेतीमालाची आवक वाढविणे आणि ‘सेस’ची काटेकोर वसुली करून उत्पन्न वाढविण्याबरोबरच आर्थिक स्वंयपूर्णतेसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे.
गडहिंग्लज व तुर्केवाडी या ठिकाणी गोदामे व कोल्डस्टोरेज बांधण्याबरोबरच मुरगूड व अडकूर येथील बाजार वाढीलादेखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Web Title: There is a challenge to deliver the past glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.