एकसष्टीत गाजली राजकीय टोलेबाजी

By Admin | Published: June 26, 2016 11:57 PM2016-06-26T23:57:46+5:302016-06-27T00:36:25+5:30

परस्परांना काढले चिमटे : कुरघोड्यांमुळे झाले कार्यकर्त्यांचे मनोरंजन

There is a convincing political mobilization | एकसष्टीत गाजली राजकीय टोलेबाजी

एकसष्टीत गाजली राजकीय टोलेबाजी

googlenewsNext

इचलकरंजी : माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम असला तरी आजी-माजी आमदारांच्या राजकीय टोलेबाजीनेच गाजला. आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार हसन मुश्रीफ व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी आपल्या भाषणातून गत राजकीय इतिहासाचा पाढा वाचत परस्परांचे चिमटे काढले.
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहाच्या सांस्कृतिक मंचावर झालेल्या कुरघोड्यांमुळे शनिवारी राजकीय क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांचे चांगले मनोरंजन झाले. कार्यक्रमात जांभळे यांचे राजकीय क्षेत्रातील सहकारी हिंदुराव शेळके यांनी टोलेबाजीला सुरुवात केली. ते म्हणाले, माझी दीर्घकालीन राजकीय कारकीर्द राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेली असली तरी हाळवणकरांमुळे मी भाजपमध्ये गेलो. त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, एकदमच ट्रॅक कसा बदललास. त्यावर मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्याकडे आलो तर पुन्हा कार्यकर्ताच व्हायला पाहिजे; पण विरोधी पार्टीत जाऊन आता नेता झालो.
अशोक स्वामी यांनी, राजकारणात आता मध्येच लटकत असल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीतून निलंबित झालोय आणि हाळवणकर काही भाजपत घेत नाहीत.
प्रकाश आवाडे म्हणाले, नगरपालिकेत आम्हाला (कॉँग्रेसला) निसटे बहुमत मिळाले; पण जांभळे असे किमयागार आहेत की, ते दोन-तीन नगरसेवकांची उलथापालथ केव्हाही करू शकतात. म्हणून आम्ही त्यांनाच (राष्ट्रवादीला) सत्तेत घेतले.
आवाडे यांच्या भाषणातील धागा पकडत सुरेश हाळवणकर म्हणाले, शहराच्या विकासाची मोट बांधावयाची संधी मिळाली तर जांभळे आमच्याबरोबर असतील आणि भाजपमध्ये आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचे निश्चितच चीज होते.
आमदार मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील गटा-तटाच्या राजकारणाचा उल्लेख करताना आवाडेंना चिमटा काढला. ते म्हणाले, नगरपालिकेच्या राजकीय बेरजेत आवाडेंनी जांभळेंना आपलेसे केले आणि मला तोंडघशी पाडले.
सुनील तटकरे यांनी जांभळे यांना आवाडे व हाळवणकर दोघेही आपलेसे करण्यासाठी चढाओढ करताहेत, कारण नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत कोपरखळी मारली. मात्र, इचलकरंजीत या व्यासपीठावर राजकारणाचे चांगलेच वस्तुपाठ मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


आवाडेंनी हायजॅक केले, हाळवणकरांनी पळविले
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारीवेळचा अनुभव सांगताना निवेदिता माने म्हणाल्या, विधानसभेचा उमेदवार कोण, या स्पर्धेत जांभळेंनी बाजी मारली आणि शेळके आम्हाला (राष्ट्रवादीला) कायमचेच दुरावले. नगरपालिकेच्या राजकारणात आवाडेंनी शेळकेंना हायजॅक केले, तर आता हाळवणकरांनी त्यांना पळवून नेले.


नगराध्यक्षांचे बंड ही आमची चूक
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडाबाबत प्रकाश आवाडे म्हणाले, नगराध्यक्षा आमच्या पक्षाच्या असल्या तरी आमच्या नाहीत. यामागे मात्र आमची चूक आहे; मात्र जांभळे यांच्या किमयेमुळे त्या विरोधकांच्याही नाहीत.

Web Title: There is a convincing political mobilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.