‘मेडिक्लेम’च्या हप्त्यात दीडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:01 AM2018-11-21T01:01:20+5:302018-11-21T01:01:24+5:30
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बहुतांशी राष्टÑीयीकृत बँकांनी मेडिक्लेम धोरणामध्ये बदल केल्याने मेडिक्लेमच्या हप्त्यात दीडपट वाढ ...
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बहुतांशी राष्टÑीयीकृत बँकांनी मेडिक्लेम धोरणामध्ये बदल केल्याने मेडिक्लेमच्या हप्त्यात दीडपट वाढ झाली आहे. आता ग्राहकाला मेडिक्लेम उतरण्यासाठी थेट विमा कंपनीकडे धाव घ्यावी लागत आहे. कंपनीकडे हप्त्याची वाढणारी रक्कम ही ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार बँकांनी करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना जीवनात अचानक आपत्तीला सामोरे जावे लागल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब जाणून राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलून, सवलतीच्या दरांची विविध विमा कंपन्यांद्वारे मेडिक्लेम योजना आणली. त्यात कमी रकमेच्या हप्त्यांमध्ये कमीत कमी ५० हजार ते जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणाचा समावेश असलेल्या योजना ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना झाला. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राष्टÑीयीकृत बँकांनी मेडिक्लेमच्या योजना बंद केल्याने ग्राहकांना त्याचा तोटा होऊ लागला आहे. विशेषत: अशा विमा कंपन्यांकडे थेट ग्राहक गेल्यानंतर त्यांना विविध वयोमानानुसार हप्ते भरावे लागतात. ही बाब ग्राहकांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक अशा वाढीव रकमेच्या हप्त्यामुळे बेजार झाला आहे.
आता तीन महिने ते किमान २५ वर्षे वयोगटातील व्यक्तिगत मेडिक्लेम उतरण्यासाठी थेट विमा कंपनीकडे जावे लागत असल्याने ग्राहकाला किमान दोन लाखांचा विमा उतरावा लागत आहे. त्यासाठी किमान २२०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी रकमेचा भार पडत आहे, तर कौटुंबिक विमा उतरण्यासाठी पती-पत्नी व एक मुलासाठी किमान ५३०० अधिक १८ टक्के जीएसटी भरावी लागत आहे. याच प्रमाणात वय वाढत जाईल त्याप्रमाणात विमा हप्त्याच्या रकमेत वाढ होत असली, तरी ती सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने सर्वसामान्य विमा ग्राहकांनी हे विमा उतरण्यासाठी पाठ फिरवली आहे.
वाहनांच्या ‘थर्ड पार्टी’ विमा रकमेतही तिप्पट वाढ
वाहनांच्या ‘थर्ड पार्टी’ विमा रकमेतही कमालीची वाढ झाली आहे. यापूर्वी दुचाकी वाहनास (१५० सीसी) १ वर्षासाठी ७२० रुपये विमा हप्ता भरला जात होता; पण आता त्यासाठी किमान १८०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहकही आता आपल्या वाहनाचा विमा उतरण्यापासून दूर होत आहेत. फक्त वाहन खरेदी करताना आणि विक्री करताना वाहनाचा विमा उतरण्याचे सोपस्कार करतात.
५० हजारांऐवजी आता
२ लाखांचा विमा
बँकांमार्फत सभासदांना कौटुंबिक संरक्षण देण्यासाठी ‘मेडिक्लेम’५० हजार रुपयांच्या विमा पॉलिसीसाठी ९२८ रुपये, तर एक लाखाच्या ‘मेडिक्लेम’साठी १८३६ रुपये आकारले जात होते. शिवाय दोन लाखांच्या ‘मेडिक्लेम’साठी ३८१२ रुपये वार्षिक हप्ता रक्कम आकारला जात होता. या विमा कवचामध्ये पती-पत्नी व २५ वयोगटातील दोन मुलांचा समावेश केला जात होता; पण आता विमा कंपनीकडे कौटुंबिक दोन लाखांचा (कमीत-कमी) मेडिक्लेम उतरताना किमान ५३०० रुपये अधिक १८ टक्के जी.एस.टी. भरावा लागतो आहे.
बँकेकडे फक्त
क्लेमसाठी सभासद
राष्टÑीयीकृत बँकेत सभासद झाल्यास, त्याला किमान ९२८ रुपये भरले, की किमान ५० हजारांचे विमासुरक्षा कवच मिळत होते; त्यामुळे बँकांकडे अनेक सभासद झाले, पण हे सर्व सभासद फक्त मेडिक्लेमसाठी होऊन त्याचा गैरफायदा उठवला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकांनी आॅक्टोबरपासून ‘मेडिक्लेम’बाबत धोरण बदलले व ते अधिकार फक्त विमा कंपनीकडेच दिले.