शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

By पोपट केशव पवार | Published: September 21, 2024 04:15 PM2024-09-21T16:15:37+5:302024-09-21T16:17:01+5:30

रोजगारासाठी मुंबई, अहमदाबाद, गोव्याकडे धाव

There is a need to expand the pharmacy sector here while setting up a new government pharmacy college in Kolhapur | शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

पोपट पवार

कोल्हापूर : गेल्या पाच ते सहा वर्षात जिल्ह्यात फार्मसी कॉलेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या कॉलेजमधील जागा पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत, अशी स्थिती आहे. त्यात जिल्ह्यात दोन ते तीनच फार्मसी कंपन्या असल्याने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्याशिवाय जॉब मिळत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरात नवे शासकीय फार्मसी कॉलेज उभारताना येथील फार्मसी क्षेत्र विस्तारण्याची गरज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कोल्हापुरात शासकीय फार्मसी कॉलेज उभारण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. १९) केली. या घोषणेमागे मंत्री पाटील यांचा उद्देश चांगला असला तरी जिल्ह्यात २०हून अधिक खासगी फार्मसी कॉलेज आहेत. यामध्ये डिप्लोमा, डिग्री शिक्षणाची सुविधा आहे. या कॉलेजमध्ये १८०० इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र, या कॉलेजमधील जागा गेल्या काही वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. याला कॉलेजची संख्या वाढणे हे एक कारण असले तरी फार्मसी क्षेत्रातील मर्यादित संधी, व्यवसायातील प्रचंड वाढलेली स्पर्धा यामुळेही फार्मसीकडील ओढा कमी होत आहे.

त्यात जिल्ह्यात फार्मसी कंपन्यांची संख्या दोन ते तीन इतकीच आहे. त्यामुळे फार्मसी विषयातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी पुणे, मुंबई, अहमदाबाद किंवा गोव्याला जावे लागते. फार्मसी कंपन्यांमध्ये मिळणारा पगार अन् महागड्या शहरांमध्ये राहण्यासाठी येणारा खर्च पाहता विद्यार्थी ही नोकरी नकोच अशा मानसिकतेत येतात. त्यामुळे या क्षेत्राकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत.

शासकीय कॉलेजमुळे कमी शुल्कात शिक्षण

सध्या फार्मसीमधून शिक्षण घ्यायचे झाले तर डिग्री, डिप्लोमासाठी विद्यार्थ्याला कमीत कमी एका वर्षासाठी ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे शुल्क मोजावे लागते. शासकीय कॉलेजमध्ये मात्र हेच शुल्क दहा हजार रुपयांपर्यंत असेल. त्यामुळे नव्या शासकीय फार्मसी कॉलेजमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कात शिक्षण घेता येईल.

दृष्टिक्षेपात फार्मसी क्षेत्र

फार्मसी कॉलेज-२०, प्रवेश क्षमता : १८००, भरणाऱ्या जागा- १००० ते ११००, मेडिकल दुकाने -३६००.

कोल्हापुरात होणाऱ्या शासकीय फार्मसी काॅलेजमुळे सर्वसामान्य, गरजू विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. - संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
 

शासकीय कॉलेजमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कमीत कमी शुल्कात शिक्षण घेता येणार आहे. हे कॉलेज जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. - मदन पाटील, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूर

Web Title: There is a need to expand the pharmacy sector here while setting up a new government pharmacy college in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.