पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता, शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:41 PM2024-07-25T17:41:19+5:302024-07-25T17:41:32+5:30
सतीश पाटील कोल्हा पूर : शिरोली येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर आणि शिये-कसबा बावडा रस्त्यावर तब्बल पाच ...
सतीश पाटील
कोल्हापूर : शिरोली येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर आणि शिये-कसबा बावडा रस्त्यावर तब्बल पाच फूट पाणी यावर्षी लवकर आले आहे. ४६, किंवा ४७ फुटांवर पंचगंगेची पातळी गेली तर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता आहे.
राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुटांवर पोहाेचल्यावर शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी यायला सुरुवात होते. शिरोली येथे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर ४६, ४७ फुटांवर पाणी पातळी गाठली की पाणी येते. सन २०१९, २०२१ साली महापूर आला तेव्हाची ही परिस्थिती होती. मात्र, सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर ४१ फूट पाणी पातळी गाठल्यावर शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आले आहे.
मंगळवारी रात्री या रस्त्यावर तीन फूट पाणी पातळी झाली. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. तर शिरोली येथील पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा मार्गावरही ४१.५ फुटांवर पाणी आले आहे. याठिकाणी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर ४६ फूट पाणी पातळी गाठल्यावर पाणी येत होते. पण यंदा तब्बल पाच फूट पाणी पातळी कमी असतानाही पाणी आल्याने शिरोली येथील सेवा मार्ग बंद झाले आहेत.
शिये-बावडा रस्त्यावर नदीपात्रात भराव टाकून आणि नदीकिनारी झालेली बांधकामे, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील बांधकामे, शिरोली महामार्गालगत मोठेमोठे भराव टाकून उभारलेली शोरूम पंचगंगा नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी ही सन २०१९, आणि २०२१ च्या तुलनेत पाच फूट लवकर विस्तारली आहे. सन २०१९, व २०२१ ला कृष्णा, कोयना, वारणा नद्यांना पूर आला असताना तसेच कोयना, वारणा राधानगरी धरणाचे दरवाजे साेडले असतानाही त्यावेळी ४५ फुटांवर पाणी आले होते.
पण यंदा तशी कोणतीही परिस्थिती नसताना आणि पंचगंगा नदीने अद्याप धोका पातळीही गाठली नसताना शिये-बावडा रस्ता बंद होतो, सेवा मार्गावर पाणी येत याला मानव निर्मित बांधकामच कारणीभूत आहेत.
असाच पाऊस राहिला आणि पाणी पातळी ४६, ४७ फुटांवर गेली तर महामार्गावर पाणी येण्याची दाट शक्यता आहे. २०१९ आणि २०२१ ला ५०, ५१ फुटांवर पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्यावर महामार्गावर पाणी आले होते. पण यंदा मात्र पाणी लवकरच येण्याची शक्यता आहे.