Kolhapur Politics: लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराबाबतही संभ्रम, भाजपच्या भूमिकेवर निर्णय

By विश्वास पाटील | Published: December 28, 2023 03:35 PM2023-12-28T15:35:36+5:302023-12-28T15:40:37+5:30

भाजपची हवा असली तरी त्या पक्षाकडून एकेका जागेबद्दल काळजी घेतली जात आहे

there is also confusion about Mahayuti candidate for Lok Sabha In Kolhapur district, decision on BJP role | Kolhapur Politics: लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराबाबतही संभ्रम, भाजपच्या भूमिकेवर निर्णय

Kolhapur Politics: लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराबाबतही संभ्रम, भाजपच्या भूमिकेवर निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील आजच्या घडीला महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत कमालीचा संभ्रम आहे. प्रत्यक्षात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यास कसेबसे साठ-सत्तर दिवस शिल्लक राहिले असतानाही नक्की कोण उमेदवार असतील यासंबंधी खात्री देता येत नाही असे चित्र आहे.

महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार म्हणून खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. लोकसभेला पुन्हा उमेदवारी व विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी या अटीवरच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघांवर शिंदे गटाचाच हक्क आहे. नव्याने सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपच्या नेत्यांकडूनही या दोन्ही उमेदवारीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे हेच घेतील, असे सांगत आहेत. परंतु खरी अडचण त्यानंतर सुरू होत आहे. 

भाजपकडून राज्यस्तरीय व केंद्रीय पातळीवरून जे सर्व्हे केले जात आहेत, त्यामध्ये या दोन्ही खासदारांच्या उमेदवारीबाबत नकारात्मक चित्र पुढे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विविध वृत्तवाहिन्यांकडून करण्यात येत असलेल्या सर्व्हेमध्येही तसेच चित्र दिसते आहे. त्यामुळे मग मंडलिक-माने यांची उमेदवारी बदलली जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचा अंदाज आल्यानंतरच खासदार माने यांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार मार्केटिंग केले. मतदार संघाशी, जनतेशी संपर्क नाही ही मुख्य तक्रार या दोघांच्या बाबतीत आहे. शिवाय शिवसेनेमुळेच ते खासदार झाले आणि पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करून ते फुटीर गटात गेल्याची नाराजीही लोकांत आहे.

लोकसभेला भाजपची हवा असली तरी त्या पक्षाकडून एकेका जागेबद्दल काळजी घेतली जात आहे. त्याची सारी सुत्रे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हाताळली जात आहेत. कोणताच धोका पत्करायला हा पक्ष तयार नाही. त्यामुळे एकदा भाजपने निर्णय घेतल्यास शिंदे गटाला तो मान्य करावा लागेल, असाही मतप्रवाह आहे. उमेदवार बदलणे किंवा आहे त्या उमेदवारांना भाजपकडून कमळ चिन्हांवर लढायला लावणे असेही पर्याय आहेत. या दोघांनाही कमळ चिन्ह हवेच आहे, त्यासाठीच त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. एकदा कमळ हातात आले की मग चेंडू भाजपच्या कोर्टात जातो. खर्चापासून यंत्रणा उभी करण्यापर्यंत पक्षाची यंत्रणा पाठिशी उभा राहते.

कोल्हापूरसाठी महाडिक यांचा पर्याय

त्याउपरही उमेदवारच बदलण्याचा निर्णय झाल्यास कोल्हापूर लोकसभेसाठी शिंदे गटाकडे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक पर्याय आहे. पण त्यांना पुन्हा आमदार होऊन मंत्रीपद हवे आहे. त्यामुळे ते लोकसभेचा विचार करण्याची शक्यता नाही. उमेदवार भाजपचा द्यायचा झाल्यास सगळ्यात पहिले नांव पुढे येते ते खासदार धनंजय महाडिक यांचे. त्यांनीही पक्षाने जबाबदारी टाकल्यास आपली लढायची तयारी असल्याचे सांगून टाकले आहे. त्यांचा संपर्क चांगला आहे. यंत्रणा आहे. लोकसभेत गेल्यावेळेला त्यांनी छाप पाडावी असे काम केले आहे. त्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने होऊ शकतो.

हातकणंगलेत आवाडे-कोरे यांची नावे चर्चेत..

हातकणंगले मतदार संघातून काही झाले तरी लढायचेच असा विचार करून राहुल आवाडे तयारी करत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनाही भाजपने राहुल यांचा विचार करावा असे वाटते. त्याचवेळी मोसमी आवाडे यांचीही हातकणंगले विधानसभेसाठी लढण्याच्या तयारीत आहेत. मतदार संघातील गावांचा नकाशाच त्यांनी टेबलवर लावून ठेवला आहे. एकदम सूक्ष्म नियोजन त्या करू लागल्या आहेत. याशिवाय आमदार विनय कोरे यांचाही भाजपसमोर पर्याय आहे परंतु ते स्वत:च त्यासाठी फारसे तयार नाहीत.

Web Title: there is also confusion about Mahayuti candidate for Lok Sabha In Kolhapur district, decision on BJP role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.