कोल्हापूर जिल्ह्यातील २४८ शाळा, महाविद्यालयांत मुलींसाठी ‘चेंजिंग रूम’च नाही
By समीर देशपांडे | Published: August 29, 2024 05:36 PM2024-08-29T17:36:03+5:302024-08-29T17:36:21+5:30
बोगस बांधकामे करण्यावरच अधिक भर
समीर देशपांडे
कोल्हापूर : एकीकडे शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत, याची माहिती घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल २४८ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘चेंजिंग रूम’च नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर ८५३ शाळांपैकी तब्बल २४० शाळांमध्ये सीसीटीव्हीच लावले नसल्याचे उघडकीस आले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबतची माहिती संकलित केली असून, त्यातून हे वास्तव उघड झाले आहे.
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा शासन आदेश काढण्यात आला. मुलींच्या सुरक्षिततेबाबत काय-काय करता येईल, याची चर्चा सुरू झाली. शाळेत कोणाचीही नेमणूक करताना त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षाविषयक कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची माहिती मागवण्यात आली.
माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचे वय हे मासिक पाळीचे वय असते. त्यामुळे अशा शाळांमध्ये मुलींसाठी ‘चेंजिंग रूम’ असणे गरजेचे आहे. परंतु राज्यातील तब्बल २४८ शाळांमध्ये अशी रूमच नाही. ही रूम शक्यतो स्वच्छतागृहाशेजारी किंवा आतील बाजूस असण्याची गरज आहे. परंतु याबाबतही अनेक ठिकाणी उदासीनता आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने मागवलेली माहिती खालीलप्रमाणे.
विद्यार्थी सुरक्षेबाबत घटक
शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे : ४६८
शाळेत सखी सावित्री समिती स्थापन : ८३१
शाळेत विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना : ८१४
शाळेत विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी : ८४७
गुड टच आणि बॅड टच मुलामुलींचे प्रबोधन : ८१८
स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण : ६८८
चेंजिंग रूम आहे : ६०५
प्रहारी क्लबची स्थापना : ७२८
काही ठिकाणी शिक्षिकांचीही गैरसोय
शहरातील काही मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थिनी तर सोडाच शिक्षिकांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे संस्थाचालक किंवा मुख्याध्यापकांच्या दालनाशेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहाचा विनंती करून वापर करतात, अशीही वस्तुस्थिती समोर आली आहे.